लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वत्र स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहाचे वातावरण असताना १५ ऑगस्ट रोजी महामेट्रो नागपूरला आणखी एक यशाचा पल्ला गाठण्यात यश आले. स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर रिच-३ (सुभाष नगर मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी) दरम्यान मेट्रोचे पहिले ट्रायल रन उत्साही वातावरणात पार पडले.खापरी ते सीताबर्डी दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू झाल्यावर या मार्गावर वाणिज्यिक सेवा कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मेट्रो ट्रेनच्या या ट्रायल रन दरम्यान महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुभाष नगर ते झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो ट्रेनचे ट्रायल रन करण्यात आले. हा प्रवास या भागातील रहिवासी तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकरिता कुतूहल आणि उत्सुकतेचा विषय ठरला. ट्रेनचा हॉर्न वाजताच हिंगणा मार्गावरून ये-जा करणारे नागरिक आपली वाहने रस्त्याच्या बाजूने उभी करत मेट्रो ट्रेनचे दृश्य बघण्यात मग्न झाले. ट्रेनचे संचालन होत असतांना उत्तर अंबाझरी मार्गावर ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी तसेच हिल टॉप, एलएडी कॉलेज चौक, धरमपेठ, शंकर नगर चौक परिसरातील रहिवाशांनी घराच्या गॅलरी व छतावरून मेट्रो ट्रेनच्या ट्रायल रनचे चित्र आपल्या मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये टिपले.डॉ. दीक्षित यांनी महामेट्रोच्या आतापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा प्रवास मांडला. महामेट्रो नागपूर प्रकल्पात उत्कृष्टरीत्या कार्य करून आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.महा मेट्रोने गाठलेले महत्वाचे टप्पे
- २१ ऑगस्ट २०१४ नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमिपूजन
- १८ फेब्रुवारी २०१५ नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची स्थापना
- ३१ में २०१५ नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे कार्यारंभ
- ३० सप्टेबर २०१७ नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ट्रायल रनला सुरुवात
- २१ एप्रिल २०१८ एयरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान जॉय राईड सुरु
- ७ मार्च २०१९ रिच -१(खापरी से सीताबर्डी इंटरचेंज) मार्गाचा शुभारंभ
- १५ ऑगस्ट २०१९ रिच -३ मार्गाच्या ट्रायल रनला सुरुवात