अधिवेशनाच्या आवश्यक कामांचा अहवाल १५ दिवसांत सादर करा; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 12:51 PM2022-09-23T12:51:06+5:302022-09-23T12:55:26+5:30

हिवाळी अधिवेशन पूर्वतयारीचा घेतला आढावा

Submit a report on necessary works of the session within 15 days, directed Assembly Speaker Rahul Narvekar | अधिवेशनाच्या आवश्यक कामांचा अहवाल १५ दिवसांत सादर करा; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश

अधिवेशनाच्या आवश्यक कामांचा अहवाल १५ दिवसांत सादर करा; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे निर्देश

Next

नागपूर : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १९ डिसेंबरपासून नागपूर येथे होणार आहे. त्यादृष्टीने विधानभवन, परिसर, रविभवन, नागभवन, आमदार निवास आणि १६० गाळे आदींच्या पूर्वतयारीचा आढावा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी येथे घेतला. अधिवेशनाच्या निमित्ताने आवश्यक असलेल्या विविध सोयीसुविधांबाबतच्या कामांचा विस्तृत अहवाल येत्या पंधरा दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

विधिमंडळाच्या मंत्री परिषद सभागृहात ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी उपरोक्त आदेश दिले. या बैठकीला विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज, उपसचिव विलास आठवले, राजेश तारवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते, अधीक्षक अभियंता दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता (विद्युत) हेमंत पाटील, उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये, माहिती संचालक हेमराज बागुल, विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, विधानभवनाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, अवर सचिव रवींद्र जगदाळे, अवर सचिव सुनील झोरे, माजी आमदार प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.

बैठकीत अध्यक्ष नार्वेकर यांनी संपूर्ण व्यवस्थेची बारकाईने माहिती घेतली. कोविड महामारीच्या काळात आमदार निवास आणि रविभवन येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. कोविडमुळे डिसेंबर २०१९ नंतर नागपूर येथे विधिमंडळाचे एकही अधिवेशन झाले नाही. त्यामुळे या परिसरातील सर्व कामांसह इमारतीच्या नूतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करून ते तत्काळ सादर करा. तसेच सभागृह परिसरातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती आदी पीठासीन अधिकाऱ्यांसह मंत्र्यांच्या दालनातील आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा तपासून घेऊन अपेक्षित बदल, दुरुस्ती, डागडुजी करावी. काही ठिकाणी आवश्यक असल्यास नवीन यंत्रणा बसवावी. सभागृहातील विद्युत व आसन व्यवस्था, ध्वनिक्षेपण यंत्रणा, स्वच्छतागृहे आदी सुविधांबाबत आवश्यक ती कामे करण्यात यावीत, असे आदेश अध्यक्षांनी दिले.

बैठकीनंतर अध्यक्षांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह दोन्ही सभागृहे, पीठासीन अधिकारी आणि मंत्री महोदयांच्या दालनासह विधानभवन परिसराची पाहणी केली. यानंतर रविभवन, १६० गाळे, आमदार निवास आदी वास्तूंची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Submit a report on necessary works of the session within 15 days, directed Assembly Speaker Rahul Narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.