नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ जूनपासून सुरुवात झाली. परंतु गेल्या चार दिवसात केवळ एक अर्ज निवडणूक विभागाकडे आला आहे. निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार होती. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने, उर्वरित दोन दिवसात मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कुही तालुक्यातील राजोला सर्कलमधून भाजपाचे भोजराज ठवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द ठरवले. ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करत नव्याने निवडणूक घेत खुल्या प्रवर्गातून या जागा भरण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक घेण्याचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला. या निवडणुकांना मुदतवाढ देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर २ जुलै रोजी सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी ६ जुलै रोजी होणार आहे. ५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.
- सोमवारी होतील राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल
निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षाच्या बैठकी सुरू आहेत. आघाडीबाबत शनिवारला निर्णय होणार असून, रविवारला उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येते. सोमवारी सर्वच पक्षाचे उमेदवार अर्ज भरणार असल्याचे समजते.