नागपूर : सर्वेक्षण करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, प्रसंगी गावातील मंदिर, मशिदी यावरील भोंग्यांद्वारे सर्वेक्षणाबाबत जनतेला माहिती द्यावी. त्यामुळे प्रत्येक शेताचा पंचनामा झाला याची खातरजमा होईल. ज्या ठिकाणी जाणे शक्य नसेल, पाणी साचले असेल त्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेऊन सर्वेक्षण पूर्ण करावे, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कीड व्यवस्थापन, रब्बीचे नियोजन, पीक पॅटर्न यासाठी शास्त्रीय सल्ला द्यावा. सर्व्हे करताना संवेदनशीलतेने करावा. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी आणि पुढील सात दिवसांत विभाागातील सहाही जिल्ह्यांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी विभागाचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिलेत.
यापुढे सर्वेक्षणाचे पंचनामे हे ग्रामसभा घेऊन त्यात सादर करावे. शेतकरी तिथेच त्यावर आक्षेप घेऊ शकतील, असेही कृषिमंत्री सत्तार यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी नागपूर विभागाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला खा. कृपाल तुमाने, खा. सुनील मेंढे, खा. अशोक नेते, आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. अभिजित वंजारी, आ. परिणय फुके, आ. सुनील केदार, आ. राजू पारवे, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, आ. डॉ. देवराव होळी, आ. सुभाष धोटे, आ. समीर मेघे, आ. नामदेव उसंडी, आ. आशिष जायस्वाल, आ. विकास ठाकरे, आ. टेकचंद सावरकर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, कृषी विभागाचे सहसंचालक राजेंद्र साबळे, वेस्टर्न कोल्ड फिल्डचे मुख्य व्यवस्थापक मनोज कुमार, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
- जुलै अखेरपर्यंतचे नुकसान, ऑगस्टमधील नुकसानीचे पंचनामे शिल्लक
नागपूर विभागाचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिके पिवळी पडली असून, जमीन खरडून गेल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, जीवाणू व बुरशीची वाढ झाली आहे. काही ठिकाणी सर्व्हे करणेदेखील कठीण असून, अजूनही शेतामध्ये पाणी साचले असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले. नागपूर विभागात कपासीचे २,४८ लक्ष हेक्टर, सोयाबीनचे १.२६ लक्ष हेक्टर, तुरीचे ४९ हजार हेक्टर, भाताचे ५५ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. विभागात जुलै अखेरपर्यंतचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचे पंचनामे पुढील आठवड्यात पूर्ण होतील असे यावेळी सांगण्यात आले.
- लोकप्रतिनिधींनी वाचला तक्रारींचा पाढा
यावेळी लोकप्रतिनिधींनी तक्रारींचा पाढा वाचला. अनेक ठिकाणी शेतावर जाऊन सर्वेक्षण झाले नाही, पंचनामे वस्तुनिष्ठ नाही, सरपंच व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नाही. रब्बीच्या नियोजनाबाबत गतीने काम करण्यात यावे. पशुधनाची मदत करताना पोस्टमार्टमसारख्या अटी ठेवू नये, २०२०-२१ मधील काही ठिकाणच्या मदती अद्याप प्राप्त नाहीत, शेतामध्ये पाणी साचले असल्यामुळे ड्रोनचे सर्वेक्षण ग्राह्य धरण्यात यावे. पीक विमा अधिकारी शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही, राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत शेतकऱ्यांना सहकार्य होत नाही अशा तक्रारी यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडल्या.