मासोळी बाजार इमारतीचे डिजाईन सादर करा : हायकोर्टाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 09:53 PM2019-06-26T21:53:54+5:302019-06-26T21:54:39+5:30
मंगळवारी येथील मासोळी बाजारच्या इमारतीचे डिझाईन एक आठवड्यात सादर करण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेला दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी येथील मासोळी बाजारच्या इमारतीचे डिझाईन एक आठवड्यात सादर करण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेला दिला.
मंगळवारी येथे ठोक मासोळी विक्रे त्यांसाठी इमारत बांधण्याकरिता महापालिकेला तीन कोटी रुपयावर निधी मिळाला होता. त्यानंतर महापालिकेने संबंधित निधीतून ठोक विक्रेत्यांसाठी केवळ चार गाळे बांधले तर, किरकोळ विक्रेत्यांसाठी १०८ ओटे तयार करण्यात आले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
मेयो रुग्णालयापुढील भोईपुरा येथील किरकोळ मासोळी बाजार मंगळवारी मार्केट इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रोहित गौर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. स्ट्रिट व्हेंडर्स (प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड अॅन्ड रेग्युलेशन ऑफ स्ट्रिट व्हेंडर्स) अॅक्ट-२०१४ मधील तरतुदींनुसार या व्यवसायासाठी लायसन्स बंधनकारक आहे. मासोळी विक्रेते या कायद्यातील तरतुदींचे पालन करीत नाही. या बाजारामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिसरात प्रदूषण निर्माण होते. मासोळ्यांच्या निरुपयोगी अवयवांची कायद्यानुसार विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सेजल लखानी, मनपातर्फे अॅड. सुधीर पुराणिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अॅड. एस. एस. सन्याल तर, मध्यस्थातर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.