लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेयो, मेडिकलमधील १६ विभाग प्रमुख खासगी इस्पितळांमध्येही आपली सेवा देत असल्याच्या कारणावरून वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकतेच फटकारले. हे प्रकरण ताजे असताना शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेयोच्या सुवर्ण जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत मेयोमधील विभाग प्रमुखांचा गेल्या वर्षभरातील प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. यामुळे मेयोतच नव्हे तर मेडिकलमधील डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ५० वर्षे पूर्ण होत आहे. डिसेंबरमध्ये सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या निमित्ताने शनिवारी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांच्यासह आमदार विकास कुंभारे व मेयोचे विभाग प्रमुख उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवाच्या तयारीनिमित्त या बैठकीत मेयो प्रशासनाने २० प्रकारच्या विविध विषयांची सूची पालकमंत्र्यांसमोर ठेवली. या महोत्सवासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना या महोत्सवाचे पालकत्व दिले जाणार आहे. मेयोतील रस्त्यांपासून ते उद्यान व ५०० खाटांचे मेडिसिन ब्लॉक अशा विविध कामांसाठी निधीची मागणी यावेळी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. यावर बावनकुळे यांनी निधी मिळेल, परंतु त्यापूर्वी विभाग प्रमुखांच्या वर्षभराच्या प्रगती अहवालाची मागणी केली. ते म्हणाले, शासन एवढा निधी खर्च करते तर आरोग्य सेवांची काय प्रगती झाली हे समोर आले पाहिजे. गेल्यावर्षी २६आॅगस्टला बैठक झाली होती. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा अहवाल या बैठकीत सादर होणे आवश्यक होते. मागील दोन वर्षात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा दिसत नाही. परिचारिकांची व विभाग प्रमुखांची रुग्णांशी असलेली वागणूक जिव्हाळ्याची नसल्यावरही त्यांनी बोट ठेवले.महोत्सवात सर्व वैद्यकीय संघटनांना सामावून घ्यासुवर्ण महोत्सव कार्यक्रमात आयएमए, खासगी डॉक्टर्स, आयुर्वेदिक डॉक्टर्स, शासनाचे सर्व रुग्णालय, सर्व संघटना यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. या शिवाय पालमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य समिती, जिल्हा परिषद यांचाही समावेश करून घेण्याचे व महोत्सवासाठी शासनाची जबाबदारी काय असेल, मेयोची जबाबदारी काय असेल, मेयोच्या विभागप्रमुखांकडे कोणती जबाबदारी असेल तसा सर्वंकष अहवाल तयार करण्याचेही निर्देश दिले.
विभाग प्रमुखांचा प्रगतीचा अहवाल सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:43 AM
मेयो, मेडिकलमधील १६ विभाग प्रमुख खासगी इस्पितळांमध्येही आपली सेवा देत असल्याच्या कारणावरून वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकतेच फटकारले.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सूचना : मेयोचा सुवर्ण महोत्सव डिसेंबरमध्ये