सुबोध मोहिते अजित पवार गटात; वर्धा लोकसभेचा मार्ग कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 09:39 PM2023-07-07T21:39:44+5:302023-07-07T21:40:15+5:30
Nagpur News माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेत समर्थन दिले.
नागपूर : माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेत समर्थन दिले. मोहिते हे राष्ट्रवादीकडून वर्धा लोकसभेसाठी इच्छुक होते. वर्धा लोकसभा भाजपकडे आहे. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत वर्धा लोकसभेची जागा अजित पवार गटाला सुटेल का, याबाबत शंका आहे. अशा परिस्थितीत काटोल विधानसभेचाही एक नवा पर्याय मोहिते यांच्यासमोर राहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मोहिते हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विजयी होत केंद्रीय मंत्री झाले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडली व काँग्रेसमध्ये आले. मात्र, पोटनिवडणुकीत रामटेक लोकसभेत त्यांचा पराभव झाला. रामटेक विधानसभेतही पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर नाराजीतून त्यांनी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर मोहिते यांनी शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मोहिते यांनी राष्ट्रवादीकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी चालवली होती. नुकतेच वर्धेतील सर्कस ग्राउंडवर मोहिते यांनी शरद पवार यांची जाहीर सभाही घेतली. मात्र, त्याच मतदारसंघातील माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, सुधीर कोठारी, काँग्रेसचे शेखर शेंडे, शिवसेनेचे अनिल देवतारे या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नये, अशी जाहीर भूमिका पत्रकार परिषदेत मांडत अप्रत्यक्षपणे मोहिते यांना विरोध केला होता.
तडस यांच्यामुळे अडचण
गेल्या वेळी वर्धा लोकसभेची जागा भाजपचे खा. रामदास तडस यांनी जिंकली होती. तडस यांच्यामागे असलेले सामाजिक समीकरण पाहता ही जागा अजित पवार गटासाठी सोडणे कठीण दिसते. मात्र, अजित पवार विदर्भातील किमान दोन जागा पदरात पाडून घेतील व त्यात वर्धा असेल, असाही दावा केला जात आहे. सध्यातरी वर्धा जिल्ह्यातून अजित पवार गटाकडे फारसे कुणी फिरकलेले नाहीत. आता मोहिते अजित पवार गटात गेल्यामुळे काँग्रेसची दावेदारीची अडचण दूर झाली आहे.
काटोलात देशमुखांविरोधात संधी?
शरद पवार यांच्याशी जवळीक असतानाही स्थानिक राजकीय समीकरण डोळ्यांसमोर ठेवूनच मोहिते यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असेल, यात शंका नाही. काटोलचे आमदार असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे शरद पवार यांच्यासोबत आहे. मोहिते हे रामटेक लोकसभेची निवडणूक दोनदा लढले आहेत. भाजपकडूनही काटोलसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. अशा परिस्थितीत अजित पवार गटाकडून मोहिते यांना काटोलमध्ये संधी दिली जाईल का, अशीची चर्चा रंगली आहे.