लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. पेगासस प्रकरणावर मांडलेली भूमिका व कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलानंतर स्वामी यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
स्वामी यांनी दुपारच्या सुमारास संघ मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांची नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, हे कळू शकले नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्याऐवजी भाजपने नवीन चेहरा देऊ नये, यासाठी स्वामी आग्रही होती. असे केल्याने भाजपचे कर्नाटकात नुकसान होईल, अशी भूमिका त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडली होती. सोबतच पेगासस प्रकरणाची तुलना त्यांनी अमेरिकेतील वॉटरगेट प्रकरणाशी करत प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. स्वामी यांनी त्यानंतर शहरात काही खासगी भेटीदेखील दिल्या.