नागपूर : रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे जेष्ठ नेते खा.सुब्रमण्यम स्वामी यांनी २४ तासातच मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले. बुधवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यानंतर त्यांचा सूर बदलला होता व केंद्र शासनाने युक्रेनमधील भारतीयांना काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
पंतप्रधान मोदी यांचा एकेरी उल्लेख करत ते रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना माघार घेण्यास सांगणार का असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केला होता. रशिया हा ब्रिक्स देशांचा सदस्य राष्ट्र असल्याचा संदर्भ देत स्वामींनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी नागपुरात संघ मुख्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रसारमाध्यमांसमोर बोलताना त्यांचे सूर बदलले होते. युक्रेन रशिया युद्धाच्या संदर्भात, भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने चांगले पाऊल उचलले आहे. भारताचे लोक जगभर आहेत, जिथे जिथे युद्ध होईल तिथे अशा प्रकारची समस्या निर्माण होईल, सद्य:स्थितीत सर्वांना पश्चिमी युक्रेनकडे जावे लागत आहे. केंद्र सरकारने तीन-चार मंत्री आजूबाजूच्या देशांमध्ये पाठविले आहेत. बसेस, विमाने यांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता ही समस्या योग्य पद्धतीने हाताळल्या जाईल, असे वाटत असल्याचे स्वामी म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसकडून प्रियंका गांधी खूप प्रचार करत आहेत. मात्र लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. लोक त्यांना विदेशीच समजतात. कॉंग्रेसची विश्वासार्हता संपली आहे, असे प्रतिपादन स्वामी यांनी केले.
शिवसेना-भाजप एकाच तत्त्वाचे पक्ष
यावेळी स्वामी यांनी शिवसेना व भाजप यांच्याबाबतदेखील वक्तव्य केले. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप एकाच तत्त्वाचे आहेत. विभक्त होण्याच्या कारणांचे विश्लेषण केले पाहिजे, असे ते म्हणाले.