लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : शेतकऱ्यांच्या साेयीकरिता महाडीबीटी पोर्टलवर शासनाने ‘शेतकरी याेजना’ सदराखाली कृषीविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना थेट अनुदानित बियाणांचा लाभ घेता येणार आहे. मात्र, यात शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे लागणार आहे.
राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी साेयाबीन, धान, तूर, मूग, उडीद पिकांच्या बियाणांचा ५० टक्के अनुदानावर लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली १५ मे २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेंतर्गत सोयाबीन, धान, तूर, मूग, उडीद आदी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. यात एका शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंत लाभ दिला जाईल. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला स्वत:च्या मोबाइल क्रमांकासह आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधारची नोंदणी करावी. त्यानंतर महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांनाही योजनेसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय अनुदान वितरित होणार नाही. अर्ज करताना काही अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी एस. एन. गिरी यांनी दिली.
....
असा मिळेल लाभ
शेतकऱ्यांनी अनुदानावर बियाणे खरेदीसाठी महाडीबीटी पाेर्टलवर अर्ज करावा. लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर अधिकृत कृषी केंद्र विक्रेत्याकडून बियाणांची खरेदी करावी. बियाणे खरेदी करताना सुधारित धान वाण हे १० वर्षांच्या आतील असल्यास किमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दाेन हजार प्रतिक्विंटल याप्रमाणे लाभ मिळणार आहे, तर १० वर्षांवरील वाण असल्यास किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल एक हजारप्रमाणे लाभ घेता येईल, तसेच कडधान्य पिकातील तूर, मूग, उडीद या पिकांसाठी १० वर्षांच्या आतील वाणासाठी किमतीच्या ५० टक्के किंवा पाच हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे लाभ दिला जाईल. १० वर्षांच्या वरील वाणाकरिता किमतीच्या ५० टक्के किंवा दाेन हजार ५०० प्रतिक्विंटलप्रमाणे लाभ दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी कृषी केंद्रातून पक्की बिले घ्यावीत. शिवाय, त्यावर वाणाच्या कालमर्यादेचा उल्लेख असणे आवश्यक आहे.