उपराजधानीत पारा ३९.४ अंशावर : वादळाचा तडाखा नागपूर : मार्च महिन्यात उपराजधानीतील पारा चढू लागला आहे. मात्र त्याचवेळी गारांचाही मारा होत आहे. यामुळे ‘दुपारी पारा आणि रात्री गारा’असा विरोधी संयोग अनुभवास येत आहे. शनिवारी दुपारी उपराजधानीत कडाक्याचे ऊन तापले. दरम्यान, कमाल ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र सायंकाळ होताच वातावरणात अचानक बदल झाला.पाहतापाहता वादळी वाऱ्यासह गारपिटीला सुरुवात झाली. त्याचवेळी जिल्ह्यातील काही भागातही गारांसह जोरदार पाऊस बरसला. दरम्यान, वीज कोसळून एकजण जखमी झाला. पिकांचे नुकसाननरखेड तालुक्यातील सावरगाव परिसरात शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वादळासह चांगलाच पाउस बरसला. यामुळे गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील शेतकरी चार वर्षांपासून सतत नापिकीचा सामना करीत आहेत. त्यातच शनिवार सायंकाळी कोसळलेल्या पावसामुळे परिसरातील गहू पूर्णपणे लोळला आहे. हरभऱ्याचेही नुकसान झाले. विशेष म्हणजे, गहू व हरभरा कापणीला आला आहे. वादळामुळे संत्रा व मोसंबी मोठ्या प्रमाणात गळाली. या पावसामुळे सावरगाव, सिंदी (उमरी), जुनोना (फुके), मसोरा, मन्नाथखेडी, पिपळा (केवळराम), मोहगाव (भदाडे),आग्रा, जोगा, शेंबडा, मालापूर, चोरखैरी आदी गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या संपूर्ण भागाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे दिवसाच्या उन्हामुळे गरम झालेले वातावरण अचानक थंड झाले. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उपराजधानीत गारपिटीला सुरुवात झाली. दरम्यान, शहरातील काही भागात बोराच्या आकाराच्या गारा पडल्याची माहिती आहे. सुमारे १० मिनिटापर्यंत वादळी वाऱ्यासह गारांचा हा वर्षाव सुरू होता. यानंतर लगेच ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, वीज पडून २० वर्षांचा मजूर भाजला गेला. ही घटना शांतिनगर बास्केटबॉल मैदानात रात्री घडली. सुभाष बरले असे जखमी मजुराचे नाव आहे. तो मूळचा बालाघाट येथील धानीटोला गावचा राहणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शांतिनगर बास्केटबॉल मैदानाला लागून असलेल्या एका उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी आलेल्या ठेकेदाराचे मजूर मैदानातच टेंट बनवून राहतात. रात्री ९.३० वाजता वीज सुभाषच्या टेंटला लागून गेली. यात सुभाष गंभीरपणे भाजला गेला. त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुभाषची प्रकृती गंभीर आहे. (प्रतिनिधी)
उपराजधानीत दुपारी पारा; रात्री गारा!
By admin | Published: March 13, 2016 3:12 AM