नागपूर : एक हजारात तीन ते चार बालकांना जन्मजात बहिरेपण असण्याची शक्यता असते. हे प्रमाण दुर्लक्षण्यासारखे नक्कीच नाही. जन्मत:च श्रवण क्षमतेची चाचणी झाल्यास अशा बालकांना शोधून त्यांच्यावर कॉक्लिअर इम्प्लांट केल्यास त्यांचे आयुष्यभर मूकबधिर अवस्थेत जीवन जगणे सहज टाळता येते, अशी माहिती इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) कान, नाक व घसा रोग विभागाचे (इएनटी) प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी दिली.
जागतिक श्रवण दिनाच्या निमित्ताने आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा, ‘असोसिएशन ऑफ ऑटोलॅरिन्गोलॉजिस्ट ऑफ इंडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नंदू कोलवाडकर, ‘एओआय’ विदर्भ शोखेचे अध्यक्ष डॉ. सव्वालाखे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. भावना सोनवने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राधा मुंजे आदी उपस्थित होत्या. मेयोच्या इएनटी विभागाने जन्मत: श्रवणदोष असलेल्या ७५ बालकांवर यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट केल्याने त्याचे कौतुक जिल्हाधिकारी डॉ. ईटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा व डॉ. कोलवाडकर यांनी केले.
- जन्मजात कर्णबधिरतेचे प्रमाण ३.६ टक्के
भारतात सर्वच प्रकारच्या श्रवणदोषाचे प्रमाण २२.४ टक्के आहे. महाराष्ट्रात जन्मजात कर्णबधिरतेचे प्रमाण जवळपास ३.६ टक्के आहे. यातील जवळपास अर्ध्या प्रकरणांमधील श्रवणदोष उपचारांनी बरा होऊ शकतो; परंतु जनजागृतीच्या अभावाने बहुसंख्यजण उपचारच घेत नाहीत, तर अनेकजण उशिरा डॉक्टरांकडे पोहोचत असल्याने त्यांना मूकबधिराचे जीवन जगावे लागत असल्याचे डॉ. वेदी म्हणाले.