लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मला माझ्या मुलीसाठी जगायचे आहे, या निर्धाराने कोरोनाबाधित महिला रुग्णालयात भरती झाली; परंतु लक्षणे गंभीर झाल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ आली. तब्बल २५ दिवस तिने व्हेंटिलेटरवर काढले. त्यावेळी तिचा निर्धार कायम होता. दुसरीकडे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ४५ दिवसांहून अधिक दीर्घकाळ इस्पितळात काढल्यावर नुकत्याच त्या बऱ्या होऊन घरी परतल्या. त्या महिलेने दिलेल्या लढ्याचे डॉक्टरांकडून कौतुक होत आहे.
स्वप्ना रासीक (३५) त्या महिलेचे नाव. स्वप्ना हीची कोविड टेस्ट १९ एप्रिलला पॉजिटिव्ह आली होती. त्यानंतर शास घेण्यास त्रास होत असल्याने क्रीम्स हॉस्पिटल येथे अॅडमिट करण्यात आले. त्यांचा ऑक्सिजनचा स्तर ८० पर्यंत घसरला होता. फुफ्फुसात कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांची प्रकृती खालावू लागली होती. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर (एनआयव्ही) ठेवण्यात आले. सोबत सर्व प्रकारचा औषधोपचार सुरू होता; मात्र स्वप्ना आणि त्यांच्या घरच्यांनी हिम्मत कायम ठेवली. त्या तब्बल २५ दिवस वेंटिलेटरवर होत्या. यावेळी अनेकदा त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनीदेखील रुग्णांच्या नातेवाइकांना कुठल्याही परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, असे सांगितले होते; आशा मात्र सोडली नव्हती. ४५ दिवसांचा लढा देत अखेर कोरोनावर मात केली. बरे झाल्यावर मुलीला भेटताना दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. स्वप्ना यांच्यावर उपचार करणारे ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले की, रुग्णाची इच्छाशक्ती आणि नातेवाइकांचा डॉक्टरांवरील विश्वास यामुळे कोरोनाचा गंभीर लक्षणामधूनही बाहेर पडणे शक्य झाले. डॉ. परिमल देशपांडे म्हणाले, २५ दिवस व्हेंटिलेटरवर राहणे ही दुर्मिळ बाब आहे. त्यांच्या जिद्दीमुळे त्यांनी कोरोनाला हरविले. योग्य औषधोपचारामुळे म्युकरमायकोसिससारख्या विकारांचासुद्धा प्रभाव पडला नाही, असे श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्निल बाकमवार यांनी सांगितले.
मुलीसाठीच जगायचं होतं.
स्वप्ना रासीक म्हणाल्या, मला माझ्या मुलीसाठी जगायचे आहे, असा ठाम निर्धार केला होता. जेव्हा ही प्रकृती खालावली तेव्हा केवळ मुलगी आणि कुटुंब एवढेच आठवायचे. डॉक्टरांनी केलेला उपचार व माझ्या पतीने दिलेली साथ त्यामुळेच कोरोनातून बाहेर येऊ शकली.