लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत मूत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या वाढत आहे. हे प्रत्यारोपण एकाच गटातील रक्तागटामध्ये व्हायचे. परंतु आता रक्त गट जुळत नसणाऱ्या म्हणजे विसंगत रक्तगटाच्या व्यक्तीच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच एका खासगी इस्पितळामध्ये विसंगत रक्तगटामध्ये यशस्वी प्रत्यारोपण झाले. ५१ वर्षीय रुग्णाला जीवनदान मिळाले.जगदीश कावरे (५१) असे त्या रुग्णाचे नाव. कावरे हे रद्दीपेपरचे व्यावसायिक आहेत. गेल्या दीड वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. पत्नीने मूत्रपिंड देण्याची तयारी दर्शवली. मात्र, दोघांचे रक्तगट वेगवेगळे होते. कावरे गेल्या एक वर्षांपासून रक्तगट जुळणाऱ्या मूत्रपिंडदात्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर त्यांच्या पत्नीने मूत्रपिंड देण्याचा धाडसी निर्णय घेतला. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जगदीश कावरे यांना भरती करण्यात आले. या हॉस्पिटलचे वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. समीर चौबे यांच्यासमोर हे एक आवाहन होते.या विषयी बोलताना डॉ. चौबे म्हणाले, ‘अॅण्टीबॉडीज’ दान केलेला अवयवाला ‘फॉरेन बॉडी’ समजून त्यावर ‘व्हायरस’ हल्ला करतात. यामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणापूर्वी रक्तातील अॅण्टीबॉडीज नष्ट करण्याचे काम केले. प्रत्यारोपण यशस्वी ठरले. अशा प्रकारच्या प्रत्यारोपणानंतर रुग्णांची फार काळजी घ्यावी लागते. अॅण्टीबॉडीजची लागण तर होत नाही ना, हे बघण्यासाठी अनेक चाचण्यांना सामोरे जावे लागते. यशस्वी ‘एबीओ इन्कॉम्पॅटीबल’ या प्रक्रियेमुळे आता मूत्रपिंड प्रत्यारोपणात भर पडण्याची शक्यता असल्याचेही डॉ. चौबे म्हणाले. या विसंगत रक्तगट मूत्रपिंडाच्या यशस्वी प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते, डॉ. स्वानंद मेलग, डॉ. भाऊ राजुरकर, डॉ. सुर्जीत हाजरा, डॉ. जितेंद्र हजारे व डॉ. भावना मेठवानी यांनी परिश्रम घेतले.रक्तगट न जुळणाऱ्या रुग्णांसाठी फायद्याचे-डॉ. चौबेडॉ. चौबे म्हणाले, मूत्रपिंड निकामी झालेल्या व्यक्तीला कुटुंबातील जवळचे नातेवाईक मूत्रपिंड देण्यासाठी इच्छुक असतात. परंतु रक्तगट जुळत नसल्याने ते अडचणीत येतात. त्यांना मेंदूमृत व्यक्तीकडून मिळणाऱ्या मूत्रपिंडाची प्रतीक्षा करावी लागते. यातही रक्तगट जुळणे महत्त्वाचे ठरते. यावर उपाय म्हणून जपान या देशात पहिल्यांदा विसंगत रक्तगटाचे प्रत्यारोपण करण्यात आले. उपराजधानीतही आता वोक्हार्ट या रुग्णालयात विसंगत रक्तगटाच्या मूत्रपिंडाचे पहिले यशस्वी प्रत्यारोपण झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन वेगळ्या रक्तगटाच्या व्यक्तीच्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपणाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा रुग्णाला होईल.