लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण १२९ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. २ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी हे अभियान वरदान ठरत आहे.
या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. या कार्यक्रमात एप्रिल ते जुलै या कालावधीत कोविड -१९ वर मात करून एकूण ३२ मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, ४ मुलांचे कोचहेलर इम्प्लँट शस्त्रक्रिया तसेच गंभीर व व किरकोळ ९३ शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.
जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळामधील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी एकूण ३८ वैद्यकीय तपासणी पथके नियुक्त करण्यात आली. या पथकामार्फत ० ते १८ वर्ष वयोगटातील एकूण ६ लक्ष ६७ हजार ६३७ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आजारी मुलांचा शोध घेवून त्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब व गरजू मुलांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी सांगितले.