गुमगाव : केवळ लॉकडाऊन काळातच नाही तर इतर वेळेलाही गरीब घटक नेहमीच शिक्षणापासून उपेक्षित राहिला आहे. मात्र अशा घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नजीकच्या किन्हाळा-सातगाव येथील ध्येयवेड्या तरुणांनी गरीब मुलांना शाळेत प्रवेश देऊन आणि त्यांच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या. इतकेच नव्हे तर त्यांना मोफत शिकवणी देत समाजऋणातून मुक्त होण्याचा ध्यास येथील उच्चशिक्षित तरुणांनी घेतला आहे. रामा धरण बांधकामासाठी त्या परिसरातील सात गावे विस्थापित झाल्याने वर्धा रोडवरील बुटीबोरीपासून हाकेच्या अंतरावर सात गाव मिळून पुनर्वसित सातगाव वसलेले आहे. याचवेळी येथील जिल्हा परिषद शाळेतील २००५-०६ च्या पहिल्या बॅचमधून शिक्षण घेतलेले काही तरुण-तरुणी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन मोफत शिकवणी वर्गातून वंचित घटकातील ६९ विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. यात प्रामुख्याने उज्ज्वल लाकडे, स्नेहा मोहितकर, इंद्रजित पटले आदींनी स्वत:ला या शैक्षणिक कार्यात वाहून घेतले आहे. याच बॅचमधील विक्की शेळके, अरण्य निकुळे, रोहित गौरकर, साहिल लाकडे, रोहित लाकडे आदी तरुण मंडळी आपल्या उदारनिर्वाहातून या शैक्षणिक कार्यास मदतही करीत आहेत. याच तरुणांना जिल्हा परिषदेच्या शाळातून सुसंस्कारित करणाऱ्या तत्कालीन गुरुजनांचा शिवजयंतीच्या पर्वावर सत्कारही करण्यात आला. यात राजू महाकुळकर, प्रीती अल्लेवाड, साधना कडवे, प्रार्थना चारबे, मंजुषा बोंद्रे, मंगला शाहू आदी गुरुजनांचा समावेश आहे. शिवजयंतीच्या याच सोहळ्यात ‘महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवबा’ यांच्या जीवनकार्यावर चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, किल्लेनिर्मिती स्पर्धा, मी पाहिलेला शिवबा यातून मूर्ती निर्माण करणे इत्यादी उपक्रमही घेण्यात आले. यात प्राविण्य पटकाविणाऱ्या विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. ‘चला करू या मैत्री शिक्षणाशी’ या राबविल्या जात असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे गुमगाव परिसरात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
ध्येयवेड्या तरुणांनी फेडले समाजाचे असेही ऋण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:11 AM