चार वर्षांपासून न चुकता दर महिन्याला ध्वजनिधीत योगदान
मंगेश व्यवहारे
नागपूर : शहीद जवानांच्या विषयी समाज माध्यमातून उतू जाणारे प्रेम प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबीयांसाठी जमा करण्यात येणाऱ्या कल्याणनिधी (ध्वजनिधी) करिता मदत करताना दिसून येत नाही. त्यामुळे दरवर्षी जिल्हा सैनिक कल्याण विभागाला देण्यात येणारे ध्वजनिधीचे उद्दिष्ट् गेल्या तीन वर्षात निम्मेही पूर्ण झाले नाही. ध्वजनिधी ऐच्छिक असल्याने सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर समान्यही योगदान देत नाही. पण याला अपवाद आहे, नागपुरातील फुल विक्रेता मनीष गडेकर. मनीषने गेल्या चार वर्षात दर महिन्यात ध्वजनिधीच्या योगदानात कधीच खंड पडू दिला नाही.
गोळीबार चौकात मनीष यांची एक छोटेसे फुलांचे दुकान आहे. विशेष म्हणजे मनीषच्या घरातील कुणीही सैन्यात नाही. पण घरातील प्रत्येकाला सेनेप्रति आपुलकी आणि जिव्हाळा आहे. मनीषने एका वृत्त वाहिनीवर ध्वजनिधी बद्दलचे वृत्त बघितले होते. ध्वज निधीचा उपयोग शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी होत असल्याने मनीषने त्यासाठी योगदान देण्याचे ठरविले. २०१७ पासून त्याने ध्वजनिधी सैनिक कल्याण विभागाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तो दर महिन्याला न चुकता ५०० रुपयांचा ध्वजनिधी विभागाकडे जमा करतो.
मनीष ध्वजनिधीत योगदान देण्याबरोबर शहीद जवानांना अर्पण करण्यात येणारे पुष्पचक्रसुद्धा विभागाला बनवून देतो. मनीषचे हे कौतुक एवढ्याचसाठी, की तो न चुकता, कुणाचाही दबाव नसताना नियमितपणे ध्वजनिधीत योगदान देतो. मनीषच्या या योगदानानिमित्त जिल्ह्यातून गोळा होणारा ध्वजनिधीचा आढावा घेतला असता, गेल्या तीन वर्षांपासून नागपूर विभागात उद्दिष्टपेक्षा निम्माच निधी संकलित होऊ शकला. विशेष म्हणजे या निधीतून शहीद जवानांचे कुटुंब आणि माजी सैनिकांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. नागपूर जिल्हा सैनिक कल्याण विभागाला २०१७ मध्ये १ कोटी ९१ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. पण ४२ टक्केच निधी संकलित झाला. २०१९ मध्ये ५२ टक्के तर २०२० मध्ये ३२ टक्के निधी संकलित झाला आहे. ध्वजनिधी संकलनासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयाला विशिष्ट रकमेचे उद्दिष्ट दिले जाते. ध्वजनिधी संकलनाचा मोठा स्रोत सरकारी अधिकारी कर्मचारी असतात. पण सरकारी कार्यालयातून उद्दिष्टच्या निम्मा ही निधी संकलित होत नाही. पण मनीष हा स्वयंम प्रेरणेतून स्वतः जाऊन ध्वजनिधी जमा करतो.
देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्याप्रति आत्मियता आहे. या देशाचे नागरिक म्हणून माझे त्यांच्याप्रति कर्तव्य आहे. याच भावनेतून हे कार्य सुरू आहे.
- मनीष गडेकर, फुलविक्रेता