लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर हा कलियुगातला देव असे म्हटले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्यातील देवत्वाची अनुभूती सारे जग घेत आहे. डॉक्टरदिनी देशभरातून त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. एकीकडे स्वत:विषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या वर्गाचे आभार मानतानाही डॉक्टरवर्ग आपल्या कर्तव्यात मश्गूल आहे. काही डॉक्टर कोरोनाशी दोन दोन हात करत थेट लढा देत आहेत तर काही आपले कर्तव्य बजावत समाजात सहभागी होऊन आरोग्य तपासणी करत आहेत.‘डॉक्टर दिनी डॉक्टर आपल्या दारी’ या संकल्पनेतून युवा चेतना मंचाच्या सहयोगाने मांग व गारुडी बेडा असलेल्या नागलवाडी येथे डॉ. आशिष अहिंवर, डॉ. कुंतल देशमुख, डॉ. संदीप अहिरकर, डॉ. श्रुती सोरते, डॉ. अश्विनी चोपडे, डॉ. शिखा सिंग, डॉ. श्रुती आष्टणकर, डॉ. सीमा शेख, डॉ. भूषण बोपचे यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. या वस्तीतील लोक मुख्यत्वे कचरा वेचणे व भीक मागण्याचे काम करतात. त्यामुळे, त्यांचे आरोग्याकडे तसेही दुर्लक्षच असते. कोरोना आणि डॉक्टर दिनाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांच्या आरोग्याचा हालहवाल यावेळी घेण्यात आला. घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांचे वाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका वंदना राऊत, वैशाली साखरकर, प्रसेनजीत गायकवाड, प्रमोद काळबांडे, अभिषेक सावरकर, संदेश लोधी, जगदीश वानोडे, शैलेश बाबूळकर, मंगला नेरकर, श्रुती नरड, अभिजीत डायघणे, मनोज नाडे, दत्ता शिर्के उपस्थित होते.
नागपुरात डॉक्टरांची अशीही संवेदनशीलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:56 AM