नागपूर : अचानक लघवी लागणे व ती रोखता न येणे अशी लक्षणे दिसून येत असतील तर हा एक आजार आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर’ (ओएबी) म्हटले जाते. गैरसोयीची व लाजिरवाणी ठरत असलेली ही लक्षणे जवळपास १४ टक्के पुरुषांमध्ये तर १२ टक्के महिलांमध्ये दिसून येतात. याचे वेळीच निदान होऊन उपचार घेतल्यास स्थिती नियंत्रणात येते. परंतु बहुसंख्य रुग्ण उपचार घेत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
‘ओएबी’ एक सिंड्रोम म्हणून ओळखले जाते. युरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट डॉ. वेद महाजन यांच्यानुसार, यात लघवी करण्याची अचानक आणि न थांबणारी गरज निर्माण होते. यामुळे दैनंदिन क्रिया जसे की कार्यालयीन काम, सामाजिक क्रिया, व्यायाम आणि झोप प्रभावित होते. वयानुसार अतिक्रियाशील मूत्राशय लक्षणांचे प्रमाण वाढते. वृद्ध रुग्ण त्यांच्या अतिक्रियाशील मूत्राशयाच्या लक्षणांवर त्यांच्या डॉक्टरांशी चर्चा करणे गरजेचे ठरते.
- स्त्री व पुरुष दोघांनाही होऊ शकतो आजार
अतिक्रियाशील मूत्राशयाचा त्रास केवळ पुरुषांनाच होतो असे नाही तर स्त्रियांनाही याचा त्रास होऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्रात याची वेगळी नोंद ठेवली जात नाही. परंतु काही अभ्यासामध्ये जवळपास १४ टक्के पुरुषांमध्ये तर १२ टक्के महिलांमध्ये ही समस्या दिसून आली आहे.
- यांना होऊ शकतो ‘ओएबी’चा त्रास
रजोनिवृत्तीतून गेलेल्या वृद्ध स्त्रिया आणि प्रोस्टेट समस्या असलेल्या पुरुषांना ‘ओएबी’ होण्याची शक्यता अधिक असते. मेंदू किंवा पाठीचा कणा प्रभावित करणारे रोग असलेल्या लोकांना, जसे की ‘स्ट्रोक’ व ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ (एमएस) यांनादेखील याचा त्रास होतो. वय वाढणे हा एक घटक आहे, परंतु सर्व लोकांना वयानुसार अतिक्रियाशील मूत्राशयाचा त्रास होत नाही. म्हणून हा वृद्धत्वाचा सामान्य भाग मानला जाऊ नये, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-ही आहेत लक्षणे
लघवीची इच्छा पुढे ढकलण्यात असमर्थता व शौचालयात पोहोचण्यापूर्वी लघवीची गळती, ही ‘ओएबी’ची लक्षणे आहेत. सुरुवातीला सौम्य असले तरी ही लक्षणे कालांतराने बिघडतात व गंभीर स्वरूपात त्रासदायक होतात. यामुळे झोपेवर, शरीरावर व मनावर याचा प्रभाव पडतो.
- जीवनशैलीतील बदल आवश्यक
‘ओएबी’वर तोंडावाटे औषधे, इंजेक्शन, मूत्राशयाशी संबंधित नसांना विद्युत उत्तेजन देणे व काही प्रकरणात शस्त्रक्रिया आदी उपचार आहेत. परंतु अतिक्रियाशील मूत्राशय व्यवस्थापित करण्यासाठी जीवनशैलीतील बदल करणे फायद्याचे ठरते. नियमित व्यायाम केल्यास व कॉफी, चहा, कार्बोनेटेड शीतपेये आणि मसालेदार पदार्थ यासारख्या मूत्राशयाला त्रास देणारे पदार्थ टाळल्यास त्याचा लाभ होतो.