नागपूर : साधारणत: रात्री ८ वाजताची वेळ. नागपुरात बहुतेकजन घराबाहेर फेरफटका मारत हाेते तर काही टेरेसवर गप्पा मारत बसले हाेते. आणि अचानक आकाशातून अग्निवर्षा हाेताना दिसली. अनेकांनी ही अवकाशातील घटना पाहिली. काहींच्या मनात कुतूहल तर अनेकांच्या मनात भीती हाेती. हा उल्कावर्षाव हाेता की आणखी काही, ही चर्चा हाेती. भूगर्भ शास्त्रज्ञांनी मात्र हा उल्कावर्षावच असल्याच्या अंदाजाला दुजाेरा दिला. विशेष म्हणजे विदर्भात ठिकठिकाणी आकाशातून हाेणारी ही अग्निवर्षा अनेकांनी पाहिल्याची माहिती आहे.
अवकाशातील घडणाऱ्या घडामोडीचे कुतूहल सर्वांनाच आहे. शनिवारी अशाचप्रकारची खगाेलीय घटना नागरिकांना बघायला मिळाली. रात्री ८ वाजताच्या सुमारास आकाशातून आगीचे गाेळे पडताना अनेकांनी पाहिले. नागपुरात रामदासपेठ, रामेश्वरी, जयताळा व इतर परिसरात ही अग्निवर्षा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांनी त्याचे फाेटाे, व्हिडीओ काढून एकमेकांना शेअर केले. उल्लेखनीय म्हणजे केवळ नागपूरच नाही तर खामगाव, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, बाजारगाव अमरावती आदी भागातही लाेकांनी हा उल्कावर्षाव पाहिल्याची माहिती मिळाली आहे.
शनिवारच्या रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांत आकाशातून जलदगतीने काही लाल रंगाच्या वस्तू खाली येत असल्याचे अनेकांना दिसले. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील ग्रामपंचायतीच्या मागे रात्री ७.४५ वाजता एका विशेष धातूची तप्त मोठी रिंग कोसळली.
त्यापूर्वी अनेकांना ती तप्त लाल रिंग आकाशातून गावाच्या दिशेने येत असल्याचे दिसले आणि क्षणातच ती प्लेट कोसळली. मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. ही धातूची रिंग एवढ्या वेगाने कोसळली की जिथे पडली, तेथील जमीनच त्या रिंगमध्ये आली. घटनेनंतर एकच गर्दी उसळली. तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. रात्री ८.१५ वाजता घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहोचला. त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळविले आहे. एखादे जुने सॅटेलाइट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली कोसळले असावे, असा अंदाज खगोल अभ्यासक प्रा.सुरेश चोपने यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या वस्तू आकाशातून पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचे गोंडपिपरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातही अनेकांना दिसले.