वंचित, आपच्या मतांचा अडबाले, झाडेंना धोका; कॉंग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणाचा फटका
By योगेश पांडे | Published: January 23, 2023 11:17 AM2023-01-23T11:17:41+5:302023-01-23T11:18:31+5:30
कॉंग्रेसमध्ये एकाच शहरात गटबाजी असताना वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया येथील नेत्यांची तोंडे विविध दिशांना
नागपूर : वंचित बहुजन आघाडी व आपच्या मतांमुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले शिक्षक भरतीचे राजेंद्र झाडे यांच्या निवडणूक भवितव्याला धोका निर्माण झाला आहे.
विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघात २२ उमेदवार रिंगणात उतरले असून, यंदा राजकीय गटा-तटाच्या राजकारणामुळेचनिवडणूक गाजते आहे. सुरुवातीपासूनच ही निवडणूक चर्चेत आहे.
भाजपने ऐनवेळी नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर केला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपात नागपूर शिक्षक मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. कुठलाही उमेदवार नसल्याने कॉंग्रेसने अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला. आपतर्फे देवेंद्र वानखेडे व वंचित बहुजन आघाडीतर्फे दीपराज खोब्रागडे यांनी दंड थोपटले आहे. दोन्ही पक्षांतर्फे ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे, त्याचा फटका अडबाले यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेषत: सोशल माध्यमांतून दोन्ही उमेदवार अडबालेंच्या व्होटबॅंकेपर्यंत जास्त प्रमाणात पोहोचत आहेत.
अडबाले यांना कॉंग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणाचेदेखील मोठे आव्हान आहे. अडबाले हे स्वत: चंद्रपूरमधील असून इतर जिल्ह्यात मतदारांना साद घालताना त्यांची स्थानिक कॉंग्रेस नेत्यांवर भिस्त आहे. मात्र कॉंग्रेसमध्ये एकाच शहरात गटबाजी असताना वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया येथील नेत्यांची तोंडे विविध दिशांना आहेत. याचा फटका अडबाले यांना बसण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसचेच नेते आशीष देशमुख यांनी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना समर्थन दिल्याने ही गटबाजी प्रकर्षाने समोर आली आहे. विविध गटात विभागलेले कॉंग्रेस नेते किती गंभीरतेने अडबाले यांच्यासाठी प्रयत्न करतील हा प्रश्न समोर येत आहे. दुसरीकडे दोन वेळेस पडल्यानंतर झाडे यांना शिक्षक भारतीने तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने त्यांच्या व्होटबॅंकेवरदेखील इतर उमेदवारांची नजर असून काही उमेदवारांनी हा मुद्दा प्रचारात ठेवला आहे.
रविवारी संपर्क, समन्वयावर भर
दरम्यान, निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट झाल्यानंतरचा पहिलाच रविवार असल्याने सर्वच उमेदवारांकडून रविवारी संपर्क व समन्वयावर भर देण्यात आला. महाविकासआघाडीतर्फे अडबाले यांच्या प्रचारार्थ नागपुरात सभा आयोजित करण्यात आली. मात्र महाविकासआघाडीतील पूर्व विदर्भातील काही अपेक्षित नेते गैरहजर होते. दुसरीकडे खोब्रागडे यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर नागपुरात पोहोचले व त्यांनी यावेळी अनेकांशी संवादखेली साधला. तर भाजपतर्फे सभेपेक्षा प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देण्यात आला.