सरसकट जुनी पेंशन योजना लागू करा- सुधाकर अडबाले यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
By कमलेश वानखेडे | Published: February 27, 2024 05:04 PM2024-02-27T17:04:19+5:302024-02-27T17:04:56+5:30
मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात आमदार सुधाकर अडबाले यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.
नागपूर : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व १ नोव्हेंबर २००५ नंतर टप्याटप्याने १०० टक्के अनुदानावर आलेल्या राज्यभरातील शाळांमधील सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना व १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त राज्यातील सर्व शिक्षक - कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे आ. सुधाकर अडबाले यांनी भेट घेत केली.
मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात आमदार सुधाकर अडबाले यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व १ नोव्हेंबर २००५ नंतर टप्याटप्याने १०० टक्के अनुदानावर आलेल्या शाळा व तुकडीवर कार्यरत राज्यभरातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नवीन पेंशन योजना लागू करण्यात आली.
नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त होऊनही राज्यातील सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात आली नाही. हा सदर कर्मचाऱ्यांवर झालेला फार मोठा अन्याय आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य असुरक्षित झालेले असून सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी आहे. ही नाराजी ते रस्त्यावर उतरून वेळोवेळी सरकारला दाखवित आहे. मात्र, सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे.
तसेच १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त राज्यातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेंशन योजनेचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा 'व्होट फॉर ओपीएस' नागपूर ते मुंबई संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचा समारोप मुंबई येथील आझाद मैदानावर २८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार असल्याचेही अडबाले यांनी अजत पवार यांना सांगितले.
यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले उपस्थित होते.