नागपूर : लोकशाहीमध्ये भाषण स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्य आहे. मात्र, काही लोकांचा मूळ स्वभाव झाला आहे कि, जेव्हा स्वतःची चूक होते तेव्हा स्वतः त्या चुकीच्या समर्थनात न्यायाधीश होतात. व जेव्हा दुसऱ्याचे चुकते तेव्हा त्याच्या विरुद्धचे न्यायाधीश होतात. हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली. नागपुरात भाजप स्थापना दिवस कार्यक्रम पार पडला यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा सपाटा सुरू आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून राज्यातलं वातावरण चांगलच तापलं आहे. या कारवाईवरून सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
मुनगंटीवार म्हणाले, जेव्हा या राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सीआरपीसीमध्ये नोटीस दिली जाते, १३८ कोटींच्या भारत देशात केंद्रीय मंत्री नारायण राणेंना नोटीस जाते, प्रवीण दरेकरांना नोटीस देली तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली की असत्यमेव जयते, हा दुटप्पीपणा शब्दांच्या रुपाने फुटला, मनातल्या वेदना शब्दातून व्यक्त झाल्या आहेत. संपादक म्हणून महाराष्ट्राचे प्रश्न गौण झाले आणि स्वतःचे प्रश्न महत्वाचे झाले. हे नवं आप्पलपोटे धोरण आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
महाराष्ट्रात वैधानिक विकास मंडळ, विदर्भ, मराठवाड्यातील नोकरीचे संरक्षण, आरक्षण गेलं, सिंचन विहिरीचे पैसे दिले नाही, निराधार योजनेचं अनुदान ६-६ महिने येत नाही, एक नव्हे तर शिशुपालाचे १०० अपराध, तशा या सरकारच्या १०० समस्या सांगता येतील, अशी टीका मुनगंटीवारांनी केली. यासोबतच जनता श्रेष्ठ नाही तर, फक्त आम्ही श्रेष्ठ आहोत, या भावनेने हे शब्दांकन करण्यात आले असून हे चुकीचे आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये एकही व्यक्ती समाधानी नाही
महाविकास आघाडीमध्ये एक तरी व्यक्ती समाधानी आहे का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना वाटतं की गृहमंत्री सुडाच्या भावनेने वागत नाही, कारवाई करत नाही, अटक करत नाही म्हणून ते नाराज आहेत. या राज्यामध्ये अनेक मंत्री आहे ज्यांना वाटते की, ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहेत त्या वेगाने पैसे खाता येत नाही. आमच्या नसत्या कुठेतरी अटकतात, अधिकारी आमचं काम थांबवतात. शिवसेनेचे नेते, अमदार, खासदार मुख्य सचिव यांच्याविरुद्ध तक्रार करायला गेले होते. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपले दुःख, वेदना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये गीते, खासदार बंडू जाधव असतील, तानाजी सावंत अशी मोठी यादी आहे. शिवसेना, राष्ट्रवादी असो की, काँग्रेस हे नाराज आहे. यांच्या नाराजीचा काही सोयरसुतक नाही. मला चिंता आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत गडचिरोलीपासून गडहिंग्लाजपर्यंत सर्वत्र जनता नाराज असून जनतेची नाराजी दूर होण्याची गरज आहे, यांची नाराजी या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मात दूर झाली नाही तरी काही फरक पडणार नाही, अशी सणसणीत टीका मुनगंटीवारांनी केली.
संजय राऊतांची कंगनाशी तुलना
श्रमातून तयार केलेल्या संपत्तीवर कारवाई केली असे राऊत म्हणाले, यावर उत्तर देताना मुनगंटीवारांनी यांनी संजय राऊतांची तुलना कंगना रनौतसोबत केली. काही महिन्यांनी किंवा वर्षांनी हा साक्षात्कार झाला. कंगना रनौतचं ऑफिस बुलडोझर चालवून तोडायला निघाले, तेव्हा ती हेच म्हणाली होती की मी कष्ट केले, मेहनत केली. हे कार्यालय बांधलं, त्यात छोट्याशा चुका असू शकतात. पण बुलडोझर घेऊन तुम्ही माझं कार्यालय तोडता. कमीतकमी या घटनेनंतर कंगना रनौत आणि संजय राऊत यांच्या विचारांमध्ये समानता आली हे एक मोठं यश मानलं पाहिजे, असा टोला मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला.