नागपूर : लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली आणि देशातील मोठ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरच्याच गडाचे तिकीट मिळाले असल्याने त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, दुसरीकडे भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या गडचिरोली व भंडारा-गोंदिया येथील उमेदवार जाहीर न झाल्याने तेथील ‘सस्पेंस’ वाढला आहे. अमरावतीबाबत पक्षाचे धोरण नेमके काय राहणार, हेदेखील गुलदस्त्यात आहे. या जागांवर पक्षाकडून धक्कातंत्र अवलंबिण्यात येणार की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
विदर्भातील दहाही जागांबाबत पक्ष संघटन काय निर्णय घेणार, याकडेच सर्व इच्छुक उमेदवार व विद्यमान खासदारांचे लक्ष लागले होते. विशेषत: महायुतीच्या जागांचे गणित बसवताना विदर्भातील किती जागांवर भाजपचे उमेदवार उतरविण्यात येतील, याबाबत विविध कयास लावण्यात येत होते. बुधवारी सायंकाळी घोषित झालेल्या यादीमध्ये नागपुरातून नितीन गडकरी, वर्ध्यातून रामदास तडस, अकोल्यातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली. तर चंद्रपुरातून अपेक्षेप्रमाणे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट मिळाले. नागपूर जिल्ह्यातील रामटेकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे असली, तरी त्यावर भाजपने दावा केला आहे. मात्र, दुसऱ्या यादीत उमेदवार जाहीर न झाल्याने भाजपची भूमिका काय? याबाबत विविध अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
‘दिल्ली से दूर’ राहू इच्छिणाऱ्या मुनगंटीवारांवरच पक्षाचा विश्वास
आश्चर्याची बाब म्हणजे मुनगंटीवार यांची दिल्लीत जाण्याची अजिबात इच्छा नाही, असे त्यांनीच स्पष्ट केले. माझे लोकसभेचे तिकीट कापले जावे, यासाठीच मी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी वक्तव्यदेखील केले होते. अशास्थितीत त्यांना उमेदवारी मिळाली असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले की काय? अशीच पक्ष वर्तुळात चर्चा होती. मुनगंटीवार दिल्लीत जाण्यासाठी इच्छुक का नाहीत हे पक्षाच्या निरीक्षकांनी जाणूनदेखील घेतले होते. मात्र, जागांचे गणित बसवताना पक्ष नेतृत्वाने मुनगंटीवार यांच्यावरच विश्वास टाकला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इच्छा नसतानादेखील त्यांना वर्धा येथून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र यादीत त्यांचे नाव नसल्याने जे बावनकुळे यांना जमले ते मुनगंटीवारांना जमले नसल्याची चर्चा आहे.
- अमरावतीच्या जागेबाबत भूमिका अनिश्चित
अमरावतीच्या जागेवर विद्यमान खासदार नवनीत राणा यांनाच तिकीट मिळेल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून राणा वादात सापडल्या आहेत. त्या भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशीदेखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटानेदेखील या जागेवर दावा केला आहे. अडसूळ पितापुत्र यावरून आक्रमक झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. महायुतीच्या जागांच्या फॉर्म्युल्यात अमरावतीबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने संभ्रम कायम आहे.
- नेते-मेंढे दोन्ही खासदार वेटिंगवर
२०१९ च्या निवडणुकीत गडचिरोली-चिमूरमधून भाजपचे अशोक नेते व भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे निवडून आले होते. भंडारा-गोंदियाचे प्रभावी राजकारणी प्रफुल्ल पटेल राज्यसभेत गेल्यामुळे भाजपला अडचणीचे जाणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, राष्ट्रवादीने (अजित पवार गट) भंडारा-गोंदियाच्या जागेवरील दावा सोडलेला नाही. मतांचे गणित पाहता भाजपला ही जागा मिळाली तरी येथे माजी मंत्री परिणय फुकेदेखील इच्छुक आहेत. त्यामुळे येथे पक्ष नवीन प्रयोग करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे गडचिरोलीतील उमेदवारदेखील जाहीर न झाल्याने विद्यमान खासदार नेते यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. तेथे राष्ट्रवादीदेखील आग्रही आहे. तेथे संघ परिवाराची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विदर्भातील महायुतीच्या जागांची स्थिती
भाजपचे हे उमेदवार जाहीरनागपूर - नितीन गडकरीअकोला - अनुप धोत्रेवर्धा - रामदास तडसचंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
प्रतीक्षेवरअमरावतीरामटेकगडचिरोलीभंडारा-गोंदियाबुलढाणायवतमाळ-वाशिम