‘तारीख पे तारीख’ कुठपर्यंत : सेलोटी येथील शिक्षक मारहाणप्रकरणनागपूर : शाळेत जाऊन शिक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणावरून उमरेडचे आ. सुधीर पारवे यांना न्यायालयाने २५ जुलैला न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले आहे. मारहाणीची ही घटना २००५ ची असून तेव्हा सुधीर पारवे हे जिल्हा परिषद सदस्य होते. घटना अशी की, उमरेडचे विद्यमान आ. सुधीर पारवे हे सन २००५ मध्ये भिवापूर तालुक्यातील कारगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य होते. याच सर्कलमधील सेलोटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक महेंद्र बारीकराव धारगावे (प्रभारी मुख्याध्यापक) याने शालेय पोषण आहारांतर्गत खिचडी शिजविणाऱ्या महिलेला त्रास देत तिचा हात पकडला होता. १० डिसेंबर २००५ रोजी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सुधीर पारवे यांना याबाबत माहिती सांगताच ते सेलोटीचे तत्कालीन सरपंच दौलत मेश्राम यांच्यासोबत शाळेत गेले. तेथे पारवे व धारगावे यांच्यात शाब्दिक वाद होऊन सुधीर पारवे यांनी आपल्या कानशिलात हाणल्याची तक्रार धारगावे यांनी भिवापूर पंचायत समितीच्या तत्कालीन गट शिक्षणाधिकारी आशा वासनिक यांच्यासह भिवापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक सभा चांगल्याच गाजल्या. सदर शिक्षकाच्या बचावाकरिता शिक्षक संघटना एकत्र येताच धारगावे यांची बदली करण्याचेही प्रयत्न झाले. याप्रकरणी भिवापूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन तपास अधिकारी गंगाधर कळंबे यांनी संबंधितांचे बयाण नोंदवूण १६ डिसेंबर २००५ रोजी हे प्रकरण उमरेडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात सादर केले. दरम्यानच्या काळात भिवापूर येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू झाल्याने २००८ मध्ये सदर प्रकरण भिवापूर न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले. सदर प्रकरणाला नऊ वर्षांचा कालावधी उलटला तरी प्रकरणातील सत्य आणि दोषी कोण, हे प्रश्न अनुत्तरित आहे. (प्रतिनिधी)
सुधीर पारवे हाजीर हो...
By admin | Published: June 26, 2014 12:46 AM