बुटीबोरीच्या म्हाडा काॅलनी येथील घटना
बुटीबोरी : मानसिक तणावातून त्रस्त होत बुटीबोरी येथील म्हाडा काॅलनी येथे राहणारे दीपक रतनलाल तिवारी (४५) यांनी शनिवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उजेडात आले.
प्राप्त माहितीनुसार दीपक हा बुटीबोरी परिसरातील गिरणीमागच्या ट्रिपल आयटी शैक्षणिक संस्थेच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सिव्हिल सुपरवायझर म्हणून कामाला होता. गत काही दिवसापासून तो मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मृत घटनादिनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी आठवडी बाजारातून परत आल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्री सर्वांनी एकत्र जेवण करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी शनिवारला सकाळी पत्नी आणि मोठी मुलगी दिया हे घरच्या समोरील गेटचे कुलूप बंद करून मॉर्निंग वाॅकला गेल्या. त्यावेळी मृताची लहान मुलगी रिया आणि मृत हे झोपले होते. मॉर्निंग वॉकवरून परत आल्यानंतर पत्नीला दीपक बेडरुममध्ये दिसला नाही. यानंतर त्याची मुलगी दिया हिने स्वंयपाल खोलीत पाहिले असता वडिलांनी गळफास लावल्याचे दिसून येताच ती किंचाळली. यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेत दीपकचा गळफास सोडून उपचाराकरिता बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत जाहीर केले. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी भारत तायडे, आशिष कछुवाहा यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.