रामटेक : श्रावण मासी हर्ष माणसी असे म्हटले जाते ! पण सणासुदीच्या या काळात साखरेचा भाव ३८ रुपयांवर गेल्याने गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे.
श्रावण महिना हा सणाचा महिना असताे. नागपंचमी, मंगळागाैरी, रक्षाबंधन, जन्माष्टमी हे सण ग्रामीण भागात जोरात साजरे केले जातात.
हिंदू परंपरेनुसार सणाच्या दिवशी गाेडधोड करण्याची पद्धत आहे. मात्र,
साखरेचा भाव वाढल्याने या सणाच्या आनंदावर काहीसे विरजण पडणार हे निश्चितच. यंदा जानेवारीत साखरेचा भाव प्रति किलो ३७ रुपये इतका होता. फेब्रुवारी-मार्चमध्ये ३५ रुपये, एप्रिलमध्ये ३७ रुपये रुपये, तर जुलैमध्ये ३६ रुपये असा होता. ऑगस्टमध्ये यात दोन दोन रुपयांनी वाढ झाली आहे. रामटेक तालुक्यात साखरेचा पुरवठा भरपूर आहे. येथील किराणा व्यावसायिक राजेराम देशमुख यांच्यानुसार साखरेचे भाव सणासुदीच्या काळात नेहमीच वाढत असतात. छोटे दुकानदार ४० रुपये दराने साखरेची विक्री करीत आहे. या दरवाढीला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. गत तीन महिन्यांत इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पुरवठादारांचा वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे एकूण किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. अशात माेठे व्यापारी बाजारात मालाचा कमी पुरवठा करतात त्यामुळे किमती वाढतात. सरकारने यासाठी ठोस धोरण निश्चित करण्याची गरज शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
श्रावण महिन्यात सण येत असल्यामुळे गाेड पदार्थ करावे लागतात; पण सण बघूनच साखरेचे भाव वाढतात. त्यामुळे आमचे आर्थिक बजेट बिघडत असते. भाव वाढल्याने काटकसर करावी लागते. त्यामुळे आम्ही कमी साखर खरेदी करताे.
- कांचन कोहळे, गृहिणी, रामटेक
---
सध्या घर कसे चालवावे ही समस्या निर्माण झाली आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. साखर महागली की पाच किलाेंच्या ऐवजी चार किलाे खरेदी करावी लागते. श्रावण महिन्याचे सण साजरे करताना विचार पडतोच; पण शेवटी परंपरा महत्त्वाची असते. सरकारने महागाई कमी करायला पाहिजे.
मनीषा माेहाडीकर, गृहिणी, परसोडा