दिनकर ठवळे
कोराडी : कोराडी येथील संघदीप बौद्ध विहाराच्या वतीने चालविण्यात येणारे सुगत सार्वजनिक वाचनालयाने दहा वर्षाच्या काळात या भागातील ८७ युवक-युवतींना शासकीय कार्यालयातील उच्च पदावर नोकरी मिळविण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठविली आहे. या कार्याची फलश्रुती मिळत असल्याचे पाहून पुढील काळात अत्याधुनिक वाचनालय उभारण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्या दृष्टीने आता भविष्यात कोराडी येथील हे वाचनालय विस्तारित करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
वीज केंद्राच्या निर्मितीसाठी जमीन व घरे अधिग्रहित केल्यानंतर महानिर्मितीच्या वतीने कोराडी येथील जुन्या गावाचे महादुलाला लागून पुनर्वसन करण्यात आले. या पुनर्वसित कोराडी गावात संघदीप बुद्ध विहार उभारण्यात आले. याठिकाणी चालणाऱ्या धार्मिक विधी बरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या आदर्शा प्रमाणे शिक्षणाला महत्त्व देत २०१२ मध्ये येथे वाचनालय सुरू करण्याचे ठरले. सुरुवातीच्या काळात संघदीप बुद्धविहारा मार्फत हे वाचनालय चालायचे. पुढे सुगत सार्वजनिक वाचनालयाचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र कार्यकारिणी तयार करण्यात आली. येथे कोराडी, खापरखेडा, महादुला, पांजरा खापा, दहेगाव, सावनेर, लोणीखैरी, घोगली, वारेगाव, सुरदेवी, माळेगाव आदी भागातील विद्यार्थी या वाचनालयाचा लाभ घेतात. मुला-मुलींची स्वतंत्र बैठक व्यवस्था, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेले पुस्तके, ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी किंवा संगणकीय प्रणालीद्वारे माहिती मिळविण्यासाठी बारा संगणकाची स्वतंत्र लायब्ररी, शिस्त व वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन यामुळे येथील विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी मदत होत आहे. या वाचनालयाने आतापर्यंत ८७ युवक-युवतींना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. त्यापैकी शिल्पा वाघमारे ही युवती इन्कम टॅक्स कार्यालयात उच्चपदावर आहे. कुही येथील रुपेश कुमरे यांना पोलीस निरीक्षक म्हणून सेवा मिळविण्यासाठी याच वाचनालयाचा उपयोग झाला आहे. बीएमसी, पोलीस विभाग, महावितरण, महाजनको, रेल्वे, एलआयसी, नागपूर मेट्रो, दिल्ली मेट्रो, विविध बँका, आरोग्य विभाग, संरक्षण विभाग, पायलट ,महापारेषण, इंडियन आर्मी, एसटी महामंडळ, इन्कम टॅक्स विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, माईल आदी क्षेत्रात येथील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सेवा प्राप्त करून घेतली आहे.
१२० अभ्यासकांची क्षमता असलेल्या या वाचनालयात लॉकडाऊनच्या पूर्वी ११० विद्यार्थ्यांनी या वाचनालायाचा वापर केला. लॉकडाऊन काळात मात्र ही संख्या रोडावली. आज या ठिकाणी ६६ विद्यार्थी नियमितपणे अध्ययन करीत आहेत.
--
संकट काळात धावून आले विद्यार्थी
या वाचनालयाच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दरमहा २०० रुपये देखभाल दुरुस्ती शुल्क घेतले जाते. मात्र इतर खर्चामुळे वाचनालयाला अनेकदा आर्थिक मदतीची गरज पडते. लॉकडाऊनच्या काळात वाचनालय बंद असल्याने व विद्यार्थी संख्या कमी झाल्याने मासिक खर्च भागविण्याचा मोठा प्रश्न वाचनालय प्रशासनापुढे निर्माण झाला होता. अशा काळात या वाचनालयाच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडले व सेवेत दाखल झाले अशा विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला. विद्यार्थ्यांना अभ्यासात पुस्तकांची कमतरता भासणार नाही याची पूर्ण काळजी घेत असल्याचे सुगत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पन्नालाल रंगारी यांनी सांगितले. या वाचनालयाचा कार्यभार सुरळीतपणे चालवण्यासाठी त्यांना उपाध्यक्ष चंद्रमणी वाघमारे, सचिव विजय वाघमारे, सहसचिव राजेंद्र सोमकुवर, कोषाध्यक्ष नितीन तागडे तसेच किशोर सोमकुवर, राधेशाम वाघमारे, रोहित वंजारी व जयंत रंगारी यांचे सहकार्य सतत लाभत असते.