लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे आलेल्या नैराश्यातून रविवारी रात्री मानकापूर परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. अनुराग अशोक तिवारी (वय २८) असे मृताचे नाव आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगरमध्ये अनुराग राहत होता.उच्च शिक्षण घेतलेला अनुराग मेडिकलमध्ये पुरविल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणाच्या कामासंबंधीचे सुपरविजन करीत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. कामात मन लागत नाही, असे तो घरच्यांना सांगत होता. तो फारसे बोलतही नव्हता. या पार्श्वभूमीवर, त्याने रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास घरी गळफास लावून घेतला. घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला जवळच्या खासगी इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही माहिती कळताच मानकापूरचे पोलीस उपनिरीक्षक कैलास मगर आपल्या सहकाऱ्यांसह अनुरागच्या घरी पोहोचले. त्यांनी घरच्यांना अनुरागच्या आत्महत्येबाबत विचारपूस केली. त्याच्या रूममध्ये एक सुसाइड नोट सापडली. जीवनातील अनेक निर्णय चुकल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत लिहून होते, असे पोलीस सांगतात. अनुरागच्या या आत्मघातकी निर्णयामुळे त्याच्या घरच्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. ते काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते, असे पोलीस सांगतात. योगेश भाऊराव धानोरकर यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अनुरागच्या आत्महत्येमागचे कारण पोलीस शोधत आहेत.
नागपुरात उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 7:07 PM
लॉकडाऊनमुळे आलेल्या नैराश्यातून रविवारी रात्री मानकापूर परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.
ठळक मुद्देनैराश्यातून केला आत्मघात : मानकापूरमध्ये घडली घटनालोकमत न्यूज नेटवर्क