लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्योत्सना मेश्राम (५६) यांनी सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बेलतरोडी येथील फॉर्च्युन श्री अपार्टमेंटच्या नवव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. त्या माजी कुलगुरु दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या पत्नी होत. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु पतीच्या मृत्यूपासून त्या मानसिक तणावात असल्याचे सांगितले जाते.
डॉ. प्रा. ज्योत्सना मेश्राम या अष्टविनायकनगर, जयताळा येथे राहतात. त्यांना एक मुलगा आहे. तो अमेरिकेत राहतो. त्या मुलाकडे गेल्या होत्या. आठ दिवसांपूर्वीच त्या परत आल्या. सध्या त्या मावशीकडे आल्या होत्या. सोमवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास त्यांनी अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरील किचनच्या गॅलरीतून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार पतीच्या मृत्यूपासून त्या मानसिक तणावात होत्या. नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख असल्याने नॅकची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. नॅक कमिटी दौऱ्यावर येणार होती. त्यामुळेही त्या तणावात असल्याचे सांगितले जाते. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.