नागपूर : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर येथील रेल्वे कॉलनीत ही घटना घडली. नाझिया परवीन मीर हुसैन (२२) असे विद्यार्थिनीचे नाव आहे.नाझिया ही मूळची बोकारो स्टील सिटी (झारखंड) येथील रहिवासी होती. तिचे आई-वडील झारखंडमध्येच राहतात.
नाझियाची मावशी माउंट रोडवरील रेल्वे कॉलनीत राहते व तिचे काका रेल्वे कर्मचारी आहेत. नाझिया तिच्या मावशीच्या घरी राहून शिकत होती व हिस्लॉप कॉलेजमध्ये बीकॉमच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. महाविद्यालयाच्या अभ्यासासोबतच ती स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. सोमवारी दुपारी पती कामावर गेल्यानंतर नाझियाची मावशी दोन्ही मुलींसोबत तिच्या खोलीत झोपली होती. नाझिया तिच्या खोलीत होती. सायंकाळी सहा वाजता मावशीने नाझियाच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा ती गळफास घेतलेल्या स्थितीत दिसली. तिने स्कार्फच्या सहाय्याने आत्महत्या केली होती. हे पाहून मावशी अक्षरश: हादरली.
याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली व सदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुसाईड नोट न मिळाल्याने त्यांनी नाझियाची पुस्तके आणि मोबाईलची तपासणी केली. त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. नाझिया ही हुशार विद्यार्थिनी होती. नाझिया कोणत्याही तणावाखाली नव्हती असे तिच्या मैत्रिणींनी सांगितले. तिने अशाप्रकारे जीवघेणे पाऊल उचलल्यामुळे कुटुंबीयही अवाक झाले आहेत. सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.