नागपूर : रामटेक गडमंदिर परिसरातील अंबाळा मार्गावर झाडाला गळफास लावून ३३ वर्षीय विवाहितेने प्रियकरासोबत आत्महत्या केली. कांचन ज्ञानेश्वर रंधई (३३), मयूर गजानन माणूसमारे (३०) दोघेही रा. सावंगी देवळी (ता. हिंगणा) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी (दि.२०) रात्री ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणा तालुक्यातील सावंगी देवळी येथील रहिवाशी असलेली कांचन ज्ञानेश्वर रंधई (३३) हिला सात आणि दोन वर्षांची मुले आहेत. तिचे घराशेजारी राहणाऱ्या मयूर गजानन माणूसमारे (३०) याच्याशी प्रेमसंबंध होते. ते दोघेही काही महिन्यांपूर्वी गावातून बाहेर पडले. दोन महिने बाहेर राहिले. याबाबत हिंगणा पोलिस स्टेशन येथे ज्ञानेश्वर याने कांचनच्या मिसिंगची तक्रारही नोंदविली होती. यानंतर हिंगणा पोलिसांनी दोघांच्याही नातेवाईला पोलिस स्टेशन येथे बोलावून समज देत कांचनला पती ज्ञानेश्वरकडे व मयूरला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले होते. पण, कांचन ही पती व आई- वडिलांकडे राहण्यास तयार नव्हती.
कांचन व मयूर दोघेही सोबत राहत असल्याने पती ज्ञानेश्वर रंधई यांनी सोडचिठ्ठी करिता कोर्टात धाव घेतल्याचे कळते. मात्र, गावात होत असलेल्या बदनामीमुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
आधी केले देव दर्शनकांचन आणि मयूर हे दोघेही मंगळवारी दुपारच्या सुमारास बाईकने रामटेक येथे आले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी गडमंदिरावर देव दर्शन घेतले असल्याची माहिती आहे. यानंतर दोघांनी सांयकाळी अंबाळा मार्गावरील झुडपानजीकच्या झाडाला रात्री ७ वाजताच्या सुमारास साडीने फास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. रात्री या परिसरात एका युवकाला ही घटना लक्षात आली. त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तिथे आढळलेल्या मोबाइलच्या आधारावर पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटविली. दोघांच्याही मृतदेहावर बुधवारी (दि.२१) दुपारी रामटेक येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पीएसआय संजय खोब्रागडे करीत आहेत.