नागपूर : शांतीनगर येथील दीक्षा भारद्वाज या तरुणीने केलेल्या आत्महत्येचे गूढ उकलले आहे. तिच्या प्रियकराने अगोदर मंदिरात विवाह केला व मग आईच्या दबावापोटी तिच्याशी घटस्फोट घेतला. याच तणावातून तिने आत्महत्या केली. या प्रकरणात पती अजय अरुण पद्माकर व त्याची आई सुमित्रा यांच्याविरोधात पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला असून अजयला अटक करण्यात आली आहे.
दीक्षा व अजय हे दोघेही एकाच महाविद्यालयात कार्यरत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. महाविद्यालयात देखील अनेकांना याची माहिती होती. लवकरच हे लग्न करतील, असाच अनेकांचा अंदाज होता; परंतु प्रत्यक्षात त्यांनी २०१९ मध्येच मंदिरात जाऊन लग्न केले होते. लग्न झाल्यावर दीक्षा अजयसोबत त्याच्या घरी गेली असता त्याच्या आईने तिच्या वाद घालत तिला घराबाहेर काढले होते. त्यावेळी तिला बरीच शिवीगाळदेखील केली होती. दीक्षा ही तिच्या भावाच्या घरी राहत होती. अजय तिच्याशी काही दिवस चांगला वागला व सगळे काही ठीक होईल अशी आशा दाखविली; मात्र नंतर लहानसहान कारणावरून तो तिच्याशी वाद घालायचा. आईच्या दबावापोटी अजयने दीक्षाशी ७ डिसेंबर २०२२ रोजी जबरदस्तीने घटस्फोट घेतला व त्यानंतर दीक्षा नैराश्यात गेली.
३१ जानेवारी रोजी तिने अजयच्या घरी जाऊन तिच्या आईला लग्नाबाबत विनंती केली होती; मात्र त्याच्या आईने नकार देत तिच्याशी वाद घातला. यामुळे दीक्षा फार दुखावली गेली होती. ती अजयवर जीवापाड प्रेम करत होती व त्याच्याशिवाय राहण्याची कल्पना तिला सहनच झाली नाही.अखेर तिने ५ फेब्रुवारी रोजी तिच्या खोलीत सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेत जीव दिला. तिने आत्महत्येअगोदर डायरीत अजय व तिच्या आईशी झालेल्या वादाबाबत लिहिले होते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून अजय व त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे.