यवतमाळचा मूळ निवासी असलेला चव्हाण हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाड्याने राहत होता. घरगुती कारणावरून त्याचा बुधवारी सकाळी ११.३० वाजता पत्नीसोबत वाद झाला. रागाच्या भरात चव्हाणने पत्नीला बेदम मारहाण केली. ती जखमी झाल्यानंतर तिच्या भावजयीने तिला डॉक्टरकडे नेले. इकडे चव्हाण कमालीचा अस्वस्थ झाला. पत्नीला एवढे बेदम मारहाण करण्यासारखा तिचा दोष नव्हता, या भावनेने त्याला अपराधीपणाची जाणीव झाली आणि त्या अवस्थेत त्याने पत्नीच्या साडीने गळफास लावून घेतला. पत्नीने घरी परल्यानंतर पतीला मृतावस्थेत बघून एकच हंबरडा फोडला. भूपेंद्र लालसिंग चव्हाणच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-----------------------
महिलेसह तिघांची आत्महत्या
नागपूर : उपराजधानीतील एका महिलेसह तिघांनी आत्महत्या केली. विशेष म्हणजे, एकाने गळफास लावून घेतला तेथे ओढणीची गाठ सुटल्याने तो खाली पडला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
जरीपटक्यातील इंदिरानगर निवासी आकाश बाबूलाल भालेराव (वय २७) याने बुधवारी सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. मात्र, ओढणीची गाठ सुटली आणि तो खाली पडला. तेथून तो बचावला मात्र खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला मेयोत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
३० जूनच्या सायंकाळी नंदनवनमधील वर्षा काळे नामक महिलेने गळफास लावून घेतला. तर, हजारी पहाड गिट्टीखदानमधील एकाने विष खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला. कमलकुमार कन्हैय्यालाल हसिजा असे त्यांचे नाव आहे. हसिजा यांनी २२ जूनला विषाक्त पदार्थ खाल्ला होता. प्रकृती ढासळल्याने त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
----
हॉटेलच्या कर्मचाऱ्याने लावला गळफास
नागपूर : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या विश्वजीत मुजुमदार (वय ३७) नामक व्यक्तीने बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. तो सदरमधील आझाद चाैकात सोनी यांच्या घरी भाड्याने राहत होता. मुजुमदार मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी होता. चार-पाच दिवसांपूर्वीच तो रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आला होता आणि त्याला एका हॉटेलमध्ये कामही मिळाले होते. त्याने आत्महत्या का केली, त्याची चाैकशी सदर पोलीस करत आहेत.
----