लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सततची नापिकी, वडिलांवर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर, त्यातच मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या चिंतेतून १९ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. कळमेश्वर तालुक्यातील सुसुंद्री येथे ही घटना घडली़. गौरव चंद्रशेखर काळे असे मृत तरुणाचे नाव आहे़ गौरवने १ जुलै रोजी विष प्राशन केले होते. सोमवारी (दि.६) रोजी त्याचा उपचारादरम्यान नागपुरातील मेयो रुग्णालयात मृत्यू झाला.घरी आईवडील व तीन थोरल्या बहिणी असे सहा जणांचे कुटुंब़ तीन ते चार एकर शेती असल्याने इतक्यांचा उदरनिर्वाह चालविणेही कठीणच. वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी व शेतीसाठी बँक व सावकाराकडून कर्ज काढले़ शेतीत नुकसान होत असताना दोन थोरल्या बहिणींचे विवाह झाले़ त्यामुळे घरी परिस्थिती आणखीनच बिकट झाली़ वाढत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे वडील नेहमीच चिंतेत असायचे़ तसेच एक बहिण लग्नाची असल्याने पैशाची जुळवाजुळव कशी करायची या विवंचनेतून गौरवने मृत्यूला कवटाळले.एनडीएचे स्वप्नही भंगलेगौरव हा अभ्यासात हुशार होता़ त्याला एनडीएमध्ये जायचे होते़ त्या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्नही सुरू होते. मात्र, वडिलांच्या वाढत्या वयामुळे त्यांना शेतीत काम करणे जमेनासे झाल्याने गौरवने महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडून वडिलांना शेतीत मदत करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे एनडीएचे स्वप्नही भंगले़