नागपूर : स्वच्छता अभियानानुसार शहरातील भिंतींवर ‘स्वच्छ नागपूर,सुंदर नागपूर’ असे लिहिण्यात येते. परंतु काही नागरिक घाण पसरवीत असल्यामुळे शहरात जागोजागी कचरा साचलेला दिसतो. बजाजनगरसारख्या पॉश वस्तीतही कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. कचरा उचलणाऱ्या गाड्याही हा कचरा उचलून नेताना दिसत नाहीत. या कचऱ्यात खाद्यपदार्थ राहत असल्यामुळे मोकाट जनावरेही तेथे गोळा होतात. त्यामुळे हा कचरा नियमित उचलण्याची मागणी होत आहे.
............
उद्यानाच्या बाहेर घाणीचे साम्राज्य
नागपूर : काचीपुरा उद्यानाच्या बाहेर नेहमीच घाण पसरलेली दिसते. सायंकाळी येथे लहान मुले खेळण्यासाठी येतात. बाहेर घाण पसरलेली असल्यामुळे तेथे डासांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे येथे खेळणाऱ्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरीसुद्धा ही घाण साफ करण्यासाठी काहीच कारवाई होताना दिसत नसल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
..............
नालेसफाईबाबत महापालिकेची उदासीनता
नागपूर : तलाव आणि नाल्यांच्या सफाईबाबत महापालिकेची उदासीन भूमिका दिसून येत आहे. शहरातील सर्व परिसरात नाल्यांमधील घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. तक्रार केल्यानंतरही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काचीपुरा भागात नाल्याची अनेक दिवसापासून सफाई न केल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
............