नागपूर : नागपूरकर दरवर्षी दाहक उन्हाळा अनुभवतात. यावर्षीही त्याची सुरुवात झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. गेल्या दहा वर्षांतील तापमानावर नजर टाकल्यास नागपुरातील तापमान किमान ४५-४८ अंश सेल्सिअसपर्यंत चढतीवर गेल्याचे दिसते. एवढ्या प्रचंड उकाड्यात शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. उन्हाळ्याची दहशत कमी करण्यासाठी जो-तो आपल्यापरीने प्रयत्न करत असल्याचे शहरातील चित्र आहे.
-जास्त पाणी प्या
वाढत्या तापमानात कष्टाची कामे करू नयेत, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमानात करावीत, उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. पाणी जास्त प्यावे. उन्हात बाहेर जाताना योग्य प्रतीचा गॉगल्स, डोक्यावर टोपी, दुपट्ट्याचा वापर करावा.
-उष्माघाताची लक्षणे
रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. याशिवाय थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे ही लक्षणेही दिसून येतात. भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साह असणे, डोकेदुखी आदी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-उष्माघातावरील उपाय
उष्माघात झालेल्या रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, पंखे, कूलर लावावेत, रुग्णाच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, रुग्णास गार पाण्याने अंघोळ घालावी, त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आइस पॅक लावावेत. वैद्यकीय सल्ला घ्यावा.
-गॅस्ट्रोची लक्षणे
दूषित अन्न व पाण्यामुळे गॅस्ट्रो होतो. उलटी होणे, मळमळणे, पोट दुखणे, अशक्तपणा जाणवणे आदी लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच रुग्णांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. औषधोपचार सुरू करावेत.
-पाणी उकळून प्यावे
या दिवसात पाणी उकळून, थंड करून प्यावे. रस्त्याकडील शीतपेय, उसाचा रस टाळावा. शिळे खाद्यपदार्थ तसेच उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ खाऊ नयेत. गॅस्ट्रोसदृश लागण झालेल्या रुग्णास घरगुती उपाय म्हणून सहा कप पाण्यात चिमूटभर मीठ व मूठभर साखर पाण्याचे मिश्रण क्षारसंजीवनी म्हणून पाजावे.