लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत कंपन्यांची संख्या वाढली. निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांचा कल हा ‘बँकिंग’, वित्त, विमा, तसेच ‘एज्युकेशन टेक्नॉलॉजी’साठी काम करणाऱ्या कंपन्यांकडे जास्त राहिला. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रकोप कायम असतानादेखील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे.
‘आयआयएम-नागपूरच्या’ सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. यंदा २१२ विद्यार्थी ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेला सामोरे गेले. यातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ‘प्लेसमेन्ट’ झाले आहे. यंदा येथे ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेत शंभरहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या कंपन्या आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यंदा सर्वात जास्त ‘स्टायपेन्ड’ २.५ लाख इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे, तर सरासरी ‘स्टायपेन्ड’ ६० हजार ९५३ इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात १२.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांनी ‘फिनटेक’, फार्मा कंपन्या, तसेच ‘ई-कॉमर्स’लादेखील प्राधान्य दिले आहे.
‘लॉजिस्टिक हब’ला मिळणार बळ
‘आयआयएम’मधील अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ‘समर इंटर्नशिप’ करणे अनिवार्य असते. ‘आयआयएम’चा दर्जा लक्षात घेता नामांकित कंपन्यांकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. ‘आयटी कन्सल्टिंग’, ‘लॉजिस्टिक्स’, ‘रिटेल’, ‘एफएमसीजी’, ‘मीडिया’, ‘बँकिंग’ इत्यादी क्षेत्रातील कंपन्या या प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून नागपूर उदयाला येत असून, या क्षेत्रातील कंपन्यादेखील ‘आयआयएम’मध्ये आल्या होत्या.
उद्योग क्षेत्रात योगदान देण्याचा प्रयत्न
कोरोनाच्या काळातदेखील आयआयएम-नागपूरला उद्योग क्षेत्राने पसंती दिली आहे. यंदा आव्हानांत वाढ झाली होती. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांना जास्त शिकायला मिळाले. शिकतानाच उद्योग क्षेत्राचा अनुभव मिळाला, तर दर्जेदार व कुशल विद्यार्थी घडतात. यामुळे व्यवस्थापन क्षेत्रात सकारात्मक वातावरणनिर्मितीदेखील होते. यंदा ‘आयआयएम-नागपूर’ने ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेत दर्जेदार कंपन्या सहभागी झाल्या. यातूनच संस्थेचा दर्जा वाढत असल्याचे दिसून येते, असे मत ‘आयआयएम-नागपूर’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी व्यक्त केले.