नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत कंपन्यांची संख्या वाढली असून १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे. यंदा विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल हा आयटी, मार्केटिंग व सेल्सकडे राहिला असून, ‘एफएमसीजी’लादेखील अनेकांनी प्राधान्य दिले आहे.
‘आयआयएम-नागपूरच्या’ सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत १७.७८ टक्क्यांनी वाढली. २४४ विद्यार्थी ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेला सामोरे गेले. यातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ‘प्लेसमेन्ट’ झाले आहे. यंदा येथे ‘समर प्लेसमेन्ट’च्या प्रक्रियेत ७७ कंपन्या सहभागी झाल्या. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या कंपन्या आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण होते.
५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘आयटी’, ‘सेल्स-मार्केटिंग’ तसेच ‘एफएमसीजी’ला प्राधान्य दिले. २० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचा कल हा आरोग्य, फार्मा, ई-कॉमर्स तसेच मीडिया-एन्टरटेनमेन्ट क्षेत्राकडे आहे. याच क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ‘समर प्लेसमेन्ट’साठी त्यांनी प्राधान्य दिले.
सरासरी ‘स्टायपेन्ड’मध्ये १२ टक्क्यांनी वाढ
यंदा सर्वात जास्त ‘स्टायपेन्ड’ ३ लाख ६० हजार इतका आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ४४ टक्क्यांनी अधिक आहे. तर सरासरी ‘स्टायपेन्ड’ ७० हजार ५५१ इतका आहे. सरासरी ‘स्टायपेन्ड’मध्ये १२.५० टक्के वाढ झाली आहे.
उद्योगक्षेत्रात योगदान देण्याचा प्रयत्न
शिक्षणक्षेत्र आणि उद्योगक्षेत्रातील दरी दूर करण्याची आवश्यकता आहे. शिकतानाच उद्योगक्षेत्राचा अनुभव मिळाला तर दर्जेदार व कुशल विद्यार्थी घडतात. यामुळे व्यवस्थापन क्षेत्रात सकारात्मक वातावरणनिर्मितीदेखील होते. ‘आयआयएम-नागपूर’चे शैक्षणिक वातावरण अतिशय चांगले असल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे, असे मत ‘आयआयएम-नागपूर’चे संचालक प्रा.भीमराया मेत्री यांनी व्यक्त केले.