हायकोर्ट : एआरटी सेंटर स्थानांतरणाचा मुद्दानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी एआरटी सेंटर (अॅन्टी रेट्रोव्हायरल थेरपी) स्थानांतरणाच्या मुद्यावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)चे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना समन्स बजावला. निसवाडे यांना ७ जुलै रोजी न्यायालयात हजर व्हायचे आहे.मेडिकलमधील एआरटी सेंटर टीबी वॉर्डात स्थानांतरित करण्यात येणार आहे. परंतु, हे सेंटर टीबी वॉर्ड येथे नेमक्या कोणत्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात येणार आहे याची माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने १६ जून रोजी दिले होते. या निर्देशाचे पालन झाले नाही. यामुळे निसवाडे यांना न्यायालयात बोलावण्यात आले आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.यासंदर्भात समाजसेवक सुनील मैसकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. एआरटी सेंटर सोनोग्राफी, एक्सरे व पॅथालॉजी विभागाजवळ असणे आवश्यक आहे. एचआयव्ही व एडस्ग्रस्त रुग्णांना या विभागात तपासणी करावी लागते. टीबी वॉर्ड मेडिकलपासून सुमारे एक किलोमीटर लांब आहे. एआरटी सेंटर टीबी वॉर्डात स्थानांतरित केल्यास रुग्णांना सोनोग्राफी, एक्सरे व पॅथालॉजी विभागात तपासणी करण्यासाठी एक किलोमीटर दूर जावे लागेल असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. विवेक अवचट यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
अभिमन्यू निसवाडे यांना समन्स
By admin | Published: July 01, 2016 2:48 AM