राज्याच्या क्रीडा सचिव वंदना कृष्णा यांना समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:02 PM2018-10-12T22:02:32+5:302018-10-12T22:03:43+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांना समन्स बजावून स्पष्टीकरण सादर करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी न्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित होण्याचे निर्देश दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांना समन्स बजावून स्पष्टीकरण सादर करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी न्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित होण्याचे निर्देश दिलेत.
क्रीडा विभागाने धोरणात्मक निर्णय घेऊन ३२ खेळांच्या शालेय स्पर्धा आयोजित करण्यास मनाई केली आहे. त्यात आष्टेडो खेळाचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्र आष्टेडो मर्दानी आखाडा यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल करून आष्टेडो खेळाच्या स्वखर्चाने राज्य व राष्ट्रस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी मागितली होती. १४ मार्च २०१८ रोजी न्यायालयाने त्यांची याचिका मंजूर करून या खेळाच्या स्पर्धांना परवानगी व मान्यता प्रदान करण्याचा आदेश सरकारला दिला होता. परंतु, सरकारने त्या स्पर्धांना मान्यता प्रदान केली नाही. त्यामुळे संघटनेने उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता कृष्णा यांना समन्स बजावला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अक्षय सुदामे यांनी बाजू मांडली.