पोलिस उपायुक्त, कळमना पोलिस निरीक्षकांना समन्स
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: September 12, 2023 06:13 PM2023-09-12T18:13:53+5:302023-09-12T18:19:44+5:30
हायकोर्ट : तांदूळ अवैधपणे जप्त केल्याचा आरोप
नागपूर : एक लाख रुपये लाच दिली नाही म्हणून, कळमना पोलिसांनी १० हजार किलो तांदूळ ट्रकसह जप्त केल्याचा गंभीर आरोप दोन धान्य व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिस उपायुक्त झोन-३ व कळमनाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना समन्स बजावून येत्या १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात हजर राहण्याचा व संबंधित आरोपावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे.
प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नीलेश भावरिया व फैजल खान मुस्तफा खान अशी धान्य व्यापाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोषी पोलिसांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. या व्यापाऱ्यांनी संबंधित तांदूळ भारती ग्रुपला विकला आहे. तो तांदूळ ट्रकमधून वांजरा येथे नेत असताना कळमना पोलिसांनी ट्रक अडवून आवश्यक कागदपत्रे मागितली. त्यानुसार, त्यांना सर्व कागदपत्रे दाखविण्यात आली. असे असताना त्यांनी ट्रक सोडण्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली.
व्यवहार कायदेशीर असल्यामुळे व्यापाऱ्यांनी लाच देण्यास नकार दिला. परिणामी, पोलिसांनी तांदळासह ट्रकही जप्त केला. त्यानंतर चार महिने एफआयआर दाखल करण्यात आला नाही. तेव्हापर्यंत तांदूळ व ट्रक पोलिसांनी अवैधरित्या जप्तीत ठेवला, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. कौस्तुभ फुले यांनी कामकाज पाहिले.