लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ५२० कोटी रुपयाच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्यात आरोपी असलेला सुनील हायटेक इंजिनिअरिंग लिमिटेडचा संचालक सुनील रत्नाकर गुट्टे (रा. नागपूर) याची पंजाबमधील भठिंडा येथील फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केली. सदर याचिका अधिकारक्षेत्रात येत नसल्यामुळे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला.
मे. सिया ट्रेडिंगचे अजय गर्ग यांच्या तक्रारीवरून पंजाबमधील भठिंडा पोलिसांनी गुट्टे व इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, गुट्टे यांनी व्हीएजी बिल्डटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक या नात्याने सिया ट्रेडिंगकडून वेळोवेळी १ कोटी ७ लाख ८८ हजार २६२ रुपयाचे स्टील व सिमेंट खरेदी केले. त्यानंतर सिया ट्रेडिंगला ८२ लाख ४६ हजार १८० रुपये दिले नाही. हा संपूर्ण व्यवहार भठिंडा येथे झाला. उच्च न्यायालयाने कोणत्याही बाबतीत हे प्रकरण त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याची बाब लक्षात घेता गुट्टे यांची याचिका फेटाळून लावली. गुट्टे ५२० कोटी रुपयाच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्यातही आरोपी आहे. या घोटाळ्यात जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाने कारवाई केली आहे. गुट्टेतर्फे ॲड. श्रद्धानंद भुतडा, सियातर्फे ॲड. आनंद परचुरे तर, पंजाब पोलीसतर्फे ॲड. सौरभ चौधरी यांनी कामकाज पाहिले.