नागपूर : पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर मेडिकलमध्ये भरती झालेले माजी मंत्री सुनील केदारांनी सात दिवसांच्या उपचारानंतर ‘सीटी अॅन्जिओग्राफी’ करण्यास नकार दिल्याने, अखेर गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणी न्यायालयाने केदार यांना २२ डिसेंबर रोजी शिक्षा सुनविल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले. येथे त्यांची ईसीजी व इतर तपासण्या करण्यात आल्या. ईसीजीमध्ये ‘हार्ट रेट’ कमी असल्याचे आढळून आले. यामुळे हृद्यरोग तज्ज्ञानी त्यांना तपासून ‘सीटी अॅन्जिओग्राफी’चा सल्ला दिला. परंतु ‘क्रिएटीनीन’ची पातळी १.५ वर गेल्याने ‘सीटी अॅन्जिओग्राफी’ पुढे ढकलण्यात आली. त्यांचा ‘एमआरआय’ व इतरही चाचण्यांचे अहवाल सामान्य होते. दरम्यान वैद्यकीय शिक्षण विभागाने कै दी रुग्णांसंदर्भात दिलेल्या दिशानिर्देशानुसार तीन दिवसानंतर डॉक्टरांचे एक पथक तयार करण्यात आले. हे पथक त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून होते.
माहितीनुसार, बुधवारी त्यांचे ‘क्रिएटीनीन’ची पातळी सामान्य आल्यावर गुरुवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ‘सीटी अँजिओग्राफी’ करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु केदार यांनी या तपासणीला नकार दिला. यामुळे डॉक्टरांच्या पथकाने रुग्णालयातून सुटी देण्याचा निर्णय घेतला. मेडिकल प्रशासनाने ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर सायंकाळपासून मेडिकल व कारागृह परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला होता. केदार यांच्या कार्यकर्त्यांनी मेडिकल परिसरात गर्दी केली होती.