लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुलपतींकडे दोन मुद्यांवर प्रलंबित असलेल्या अपील्स तातडीने निकाली काढण्याचे आदेश मिळविण्यासाठी मिश्रा यांनी दाखल केलेल्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी तांत्रिक कारणावरून खारीज केल्या. त्यामुळे मिश्रा यांना जोरदार दणका बसला.न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला. गेल्या २४ जुलै रोजी न्यायालयाने याचिकांवर सुनावणी केल्यानंतर कुलपती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव व इतरांना नोटीस बजावून ४ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला होता. असे असताना मिश्रा यांनी १३ आॅगस्ट रोजी या याचिका सुनावणीसाठी न्यायालयाच्या पटलावर आणल्या. दरम्यान, त्यांनी याची माहिती प्रतिवादींना दिली नाही. तसेच, प्रतिवादींना उत्तर दाखल करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत वेळ दिला असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे न्यायालयाने कुलपतींचे सचिव बी. व्ही. रेड्डी यांना सहा आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास पुढील तारखेला व्यक्तीश: न्यायालयात हजर होण्यास सांगितले. त्यानंतर नागपूर विद्यापीठाचे वकील सुधीर पुराणिक यांनी प्रतिवादींना उत्तरासाठी ४ सप्टेंबरपर्यंत वेळ असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. परिणामी, मिश्रा यांची नियमबाह्य कृती पुढे आल्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण पुढील आदेशाकरिता गुरुवारी सुनावणीसाठी ठेवून घेतले होते. दरम्यान, मिश्रा यांना स्वत:च्या चुकीसंदर्भात न्यायालयाचे समाधान करता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या याचिका फे टाळून लावल्या. नागपूर विद्यापीठाने सुनील मिश्रा यांच्या सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली नाही. तसेच, मिश्रा यांना विद्यापीठ व विद्यापीठाशी संबंधित परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांविरुद्ध मिश्रा यांनी कुलपतींकडे अपील दाखल केले आहे.
सुनील मिश्रा यांना हायकोर्टाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 1:13 AM
कुलपतींकडे दोन मुद्यांवर प्रलंबित असलेल्या अपील्स तातडीने निकाली काढण्याचे आदेश मिळविण्यासाठी मिश्रा यांनी दाखल केलेल्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी तांत्रिक कारणावरून खारीज केल्या. त्यामुळे मिश्रा यांना जोरदार दणका बसला.
ठळक मुद्देनियमबाह्य कृती केली : दोन्ही याचिका फेटाळल्या