नागपूर : नाेव्हेंबरच्या सुरुवातीला पाऊस येईल, अशी अफवा पसरविली जात असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, पावसाची शून्य टक्के शक्यताही विदर्भ किंवा महाराष्ट्रात नाही, असे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, दव पडण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण असून, त्यामुळे रात्रीपासून पहाटेपर्यंत गारव्याची जाणीव हाेत आहे. दिवसा मात्र उन्हाचा त्रास साेसावा लागत आहे.
मान्सूनने २३ ऑक्टाेबर राेजी देशातून पाय काढला; पण विदर्भात त्यापूर्वीच आकाशातून ढग गायब झाले हाेते. सध्या आकाश स्वच्छ आणि निरभ्र असल्याने थंडीत हळूहळू वाढ हाेत आहे. दरम्यान, ईशान्य मान्सून वाऱ्याने तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे. या प्रभावाने आंध्र व तामिळनाडू, तसेच अंदमान व निकाेबार, केरळ भागात जाेरात पाऊस येण्याचा अंदाज आहे. मात्र, त्याचा कुठलाही प्रभाव महाराष्ट्रावर नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीएवढे म्हणजे ३१ ते ३३ अंशांच्या आसपास असल्याने दिवसा उन्हाचा त्रास हाेत आहे. सायंकाळी मात्र तापमानात घसरण हाेणे सुरू हाेते आणि गारवा जाणवायला लागताे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान १६.६ अंश नाेंदविण्यात आले, जे गुरुवारपेक्षा एका अंशाने अधिक असले तरी सरासरीपेक्षा १ अंशाने कमी आहे. गाेंदिया, अमरावती, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात ते २ ते ३ अंशाने घटले आहे. या प्रभावाने मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत वातावरणात गारवा जाणवताे. नाेव्हेंबरमध्ये यात आणखी घसरण हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.