नागपूर : बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास नागरिकांचे दैनंदिन काम सुरू असताना अचानक विमानांचा जोरात आवाज यायला लागला आणि क्षणात लाल रंगाच्या ‘सूर्यकिरण’ टीमच्या विमानांचे अवकाशात दर्शन झाले. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच एका टोकावरून दुसऱ्या टोकावर विमान गेल्यावरदेखील आवाज मात्र कायम राहत होता. ‘एअर फेस्ट - २०२२’च्या अगोदरच या विमानांच्या सरावामुळे बुधवारीच काही नागपूरकरांना ‘एरोबेटिक्स’ पाहण्याची संधी मिळाली.
‘एअर फेस्ट’मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण टीम आपल्या हॉक विमानांसह दोन दिवस अगोदर नागपुरात दाखल झाली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून अचानक सूर्यकिरण टीमचे हायस्पीड विमान शहराच्या आकाशात सराव करताना दिसले. पुढील पाऊण तास हा सराव सुरू होता. यावेळी नागपूरकरांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.
विशेष म्हणजे नागपूरला पोहोचल्यानंतर सूर्यकिरण टीममधील पायलटस् गुरुवारी वेळापत्रकानुसार सराव करणार होते. मात्र, बुधवारी सकाळी अचानक नागपुरातील काही भागात आकाशात हायस्पीड विमानांचे आवाज घुमू लागले. लोक पटकन आपापल्या छतावर पोहोचले आणि त्यांनी आकाशाकडे पाहिले तर सूर्यकिरण टीमची लाल रंगाची विमाने आकाशात घिरट्या घालताना दिसली. सुमारे अर्धा डझन विमाने आकाशात एकामागून एक सराव करत होती. भारतीय वायुसेनेकडून यंदा नागपुरात एअर फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम एअरफोर्स सिटी हेडक्वार्टर मेंटेनन्स कमांडच्या परेड ग्राऊंडवर होणार आहे. ही विमाने सोनेगाव स्थानकावरून टेकऑफ करून परत तेथे ‘लॅंड’ होणार आहेत.
यांचा राहणार ‘एअर फेस्ट’मध्ये सहभाग
-सूर्यकिरण एरोबॅटिक टीम
- सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम
- आकाशगंगा टीम
- एअर वॉरियर ड्रिल टीम
- पॅराग्लायडिंग ट्रूप्स