नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला सूर्याचा प्रकाेप मंगळवारीही कायम हाेता. विदर्भातील पाच जिल्ह्यात पारा ४३ अंशावर हाेता तर दाेन जिल्ह्यात जवळ पाेहचला हाेता. आकाशातून आग ओकल्यासारखी अंगाची लाहीलाही हाेत असल्याची जाणीव हाेत हाेती. मात्र बुधवारपासून हा उष्णकाेप काहीसा मंदावणार असून आकाशात ढगांसह विजगर्जना व वादळी वातावरण तयार हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मंगळवारी नागपूरचे कमाल तापमान ४१.२ अंश नाेंदविण्यात आले पण उष्णतेची जाणीव त्यापेक्षा अधिक हाेती. सूर्याच्या चटक्यांनी अंग हाेरपळल्यासारखे जाणवत हाेते. दरम्यान गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही विदर्भातील तापमान विक्रमाकडे जाण्याची चिन्ह दिसत आहेत. पाच शहरातील पारा ४३ अंशावर पाेहचला आहे. यामध्ये ४३.६ अंशासह चंद्रपूर सर्वाधिक तापले हाेते तर त्याखालाेखाल गाेंदिया, भंडारा, ब्रम्हपुरीचा पारा ४३.२ अंशावर हाेता. वर्धा, यवतमाळचे तापमान ४३ अंशावर हाेते. याशिवाय अकाेला व अमरावतीत पारा ४२.८ अंश नाेंदविण्यात आला. वाशिममध्ये ताे ४२ वर हाेता. केवळ बुलढाणा ४० अंशाच्या खाली हाेता. रात्रीचे तापमानही २४ तासात वाढले हाेते.
बुधवारपासून वातावरणात बदल हाेण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. १९ ते २२ एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस नसला तरी वादळी स्थिती राहणार असण्याची शक्यता आहे. १९ राेजी नागपुरात तुरळक ठिकाणी हलका पाऊस हाेईल, असा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान २ ते ३ अंशाने खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.