सुपर एक्सक्लुझिव्ह, यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आताच्या शिंदे-भाजप सरकारमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी २९ जुलै २०१९ रोजी गायरानाची पाच एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले होते, अशी बाब आता समोर आली आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप होत असताना आता राठोड हेही विरोधकांच्या रडारवर येण्याची दाट शक्यता आहे.
महसूल राज्यमंत्री म्हणून या प्रकरणाची सुनावणी राठोड यांच्याकडे झाली होती. सावरगाव (ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) येथील गायरान जमिनीचे हे प्रकरण आहे. शासकीय इ-क्लास गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची कुठलीही तरतूद नियमात नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी तसे आदेश दिलेले आहेत, असे नमूद करून वाशिमच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मंगरुळपीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही, असे लेखी आदेश दिलेले होते. शांताबाई जाधव यांच्या अर्जावर या दोघांनी हा शेरा दिला होता.
तथापि, संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी १७ मे २०१८ रोजी दिलेला हा आदेश रद्द ठरविला आणि संबंधित पाच एकर जागा नियमानुकूल करण्याची कार्यवाही एक महिन्याच्या आत करावी, असे आदेश दिले होते. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती तपासली नाही, असा अभिप्राय दिला आणि ही जमीन १९७५पासून अतिक्रमित असल्याने नियमित करण्यास पात्र असल्याचेही नमूद केले होते. माहितीच्या अधिकारात ही माहिती हाती आली आहे. राठोड यांच्याशी संबंधित आणखी काही प्रकरणे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राठोड ‘नॉट रिचेबल’
यासंदर्भात संजय राठोड यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने २७ वेळा संपर्क केला असता दोन्ही मोबाइल बंद होते. त्यांच्या पीएना फोन केला तर त्यांनी साहेबांशी संपर्क होत नसल्याचे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"