लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधिताच्या हृदय शस्त्रक्रियेला घेऊन रुग्णाचे नातेवाईक व संबंधित विभागाच्या डॉक्टरांमध्ये सोमवारी अचानक वाद झाल्याने खळबळ उडाली. परंतु अधिष्ठात्यांनी आवश्यक त्या सर्व खबरदारी घेऊन रुग्णावर ‘सुपर’मध्येच शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना केल्याने नातेवाईक व डॉक्टरांमधील गोंधळ शमला.
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदय शल्यचिकित्सा विभागात (सीव्हीटीएस) कोविडमुळे मागील सात महिन्यांपासून गंभीर शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी हृदय शस्त्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मागच्याच महिन्यात दिले होते. त्यानुसार, सीव्हीटीएस विभागात सोमवारी ५१ वर्षीय रुग्णावर हृदयावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याचा कळताच सीव्हीटीएस विभागाने रुग्णाला मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले.परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी याला नकार दिला. ‘सुपर’मध्येच शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह धरला. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नातेवाईकांनी एका लोकप्रतिनिधीकडे तक्रारही केली. हे प्रकरण डॉ. मित्रा यांच्याकडे गेले. त्यांनी तातडीने रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याशी चर्चा केली. यात ‘सुपर’मध्येच हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दुपारनंतर रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये कोरोना काळातील ही पहिली हृदय शस्त्रक्रिया ठरली.
रुग्णावर ‘सुपर’मध्येच शस्त्रक्रिया
कोविडबाधित रुग्णावर ‘सुपर’मध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्याचा सूचना अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी दिल्या. त्यानुसार आज शस्त्रक्रिया झाली. रुग्णालयात कोणी गोंधळ घातल्याची तक्रार प्राप्त झाली नाही.
डॉ. मिलिंद फुलपाटील
विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल